
एमजेतील कार्यशाळेत आवाजासह सूत्रसंचालनावर मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या सूत्रसंचालन कार्यशाळेत जळगाव आकाशवाणीच्या माजी ज्येष्ठ निवेदिका डॉ. उषा शर्मा यांनी आवाजाचे विविध पैलू आणि सूत्रसंचालनाच्या बारकाव्यांवर मार्गदर्शन केले. डॉ.शर्मा यांनी सहभागी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना ‘आवाजाचे चढ-उतार, माधुर्य आणि आवाजाची घ्यायची विशेष काळजी’ अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती दिली. सूत्रसंचालनासाठी आवश्यक असणारे भाषिक कौशल्य आणि सादरीकरणाच्या विविध पैलूंवर त्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ. शमा सराफ आणि केसीई सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी संदीपकुमार केदार यांची उपस्थिती होती. दोन महिने चालणाऱ्या सूत्रसंचालन वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी आयोजित केलेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत डॉ. मृणालिनी फडणवीस, डॉ. भाग्यश्री भल्वतकर, डॉ. योगेश महाले, डॉ. शमा सराफ, आरजे शुभांगी बडगुजर आणि अमर राजपूत यांनी सहभाग घेऊन विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
शुक्रवारी, २१ नोव्हेंबर रोजी विशेष सत्र कार्यशाळेत नाट्यकलावंत हेमंत पाटील यांचे सत्र होणार आहे. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि भाषिक कौशल्ये आत्मसात करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळत आहे.


