Jalgaon : जळगाव प्रथमच्या कार्यकर्त्यांना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले मार्गदर्शन

0
2
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले मार्गदर्शन

 

शहरातील वाढत्या समस्या, बदलाची गरज, लोकसहभाग आणि आगामी ‘घर-घर संपर्क अभियान’ यावर सविस्तर चर्चा

साईमत जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरातील वाढत्या नागरी समस्या-पायाभूत सुविधांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छतेचा अभाव, पाणीपुरवठ्यातील विस्कळीत कारभार, वाढती गुन्हेगारी तसेच असुरक्षित वाहतूक-यामुळे नागरिक त्रस्त असताना ‘जळगाव प्रथम’ या अराजकीय सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे मार्गदर्शन घेऊन शहराच्या प्रश्नांवर आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली.

आजच वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या लेखात सुरेशदादा यांनी राज्यकर्ते यांची प्रशासनावर त्यांची पकड राहिलेली नाही. दूरदृष्टी व प्रशासकीय क्षमता असणार्‍यांना मनपात संधी दिली पाहिजे. जळगावला सिंगापूर करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत आहे, असे विचार मांडले होते. या मतांनी प्रेरित होऊन जळगाव प्रथमच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतली आणि संघटनेच्या सुरू असलेल्या कार्यवाहक उपक्रमांची माहिती दिली.

जळगाव प्रथमचे संस्थापक संयोजक, माजी आमदार अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने शहराच्या बदलत्या रचनेत वाढलेल्या समस्या-खड्डे, दुय्यम पायाभूत सुविधा, ड्रेनेजची दुरवस्था, रस्त्यांवरील अंधार, वाहतूक कोंडी आणि रात्रीची असुरक्षितता-याबाबत दादांना सविस्तर माहिती दिली व मार्गदर्शन घेतले. संघटनेसोबत आयआयए, क्रेडाई, इंजिनीअर, उद्योजक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ कार्यरत असल्याचेही दादांना सांगण्यात आले.

या भेटीत दादा यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीतील अनुभव शेअर करत 1985 पासून जळगावकरांच्या घरोघरी जाऊन विश्वास निर्माण केल्याचे नमूद केले. लोकांचा विश्वास संपादन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बदल हवा असेल तर लोकांना जवळ घेतले पाहिजे. जळगाव प्रथमनेही घराघरात जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असा सल्ला त्यांनी दिला. जळगाव प्रथमचे सुमारे 100 अराजकीय कार्यकर्ते मनापासून शहराच्या प्रश्नांवर काम करत असल्याचे त्यांनी कौतुकाने नमूद केले.

या भेटीत पुढील काही दिवसांत जळगाव शहरात ‘घर-घर संपर्क अभियान’ राबविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शहरातील समस्या ऐकून घेणे, उपाय सुचवणे आणि नागरिकांना बदलाच्या मिशनमध्ये सहभागी करून घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असेल, असे जळगाव प्रथमचे संस्थापक अ‍ॅड. बाविस्कर यांनी स्पष्ट केले.

या भेटीमध्ये शिवराम पाटील, उद्योजक कैलास कासार, आर्किटेक्ट वैशाली पाटील, अ‍ॅड. जमील देशपांडे, सुरेश पांडे, संग्रामसिंग सूर्यवंशी, सरिता खाचणे, किरण राजपूत, किरण तळले आदी मान्यवर उपस्थित होते.

जळगावच्या बदलत्या शहररचनेतील समस्या निर्णायक टप्प्यावर पोहचत असताना, अराजकीय पद्धतीने नागरिकांना एकत्र आणून काम करणारी ‘जळगाव प्रथम’ सारखी संस्था आशादायी ठरत असल्याचे या भेटीच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट झाले आहे. शहरातील प्रश्नांवर समन्वयाने मार्ग शोधण्याची नवी दिशा या चर्चेतून मिळाल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here