
साईमत नाशिक प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी धावपळ सुरू झाली असून १२२ जागांसाठी तब्बल ५२५ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक जागेसाठी सरासरी पाच उमेदवारांची स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीत भाजपला चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र आहे.
सध्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मनमाड व नांदगाव येथे शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत दिसते. तर भगूरमध्ये शिवसेना शिंदे गटाविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आहेत. या घडामोडींमुळे महानगरपालिका निवडणुकीतही महायुतीची रेष पसरून राजकारण तापण्याची शक्यता वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेवरील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने व्यूहरचना लवकरच सुरू केली आहे. शिवसेनेतील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात ओढण्यात भाजपला यशही मिळाले आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संपूर्ण तयारीची जबाबदारी सोपवण्यात आली असून ते रणनीती आखण्यात गुंतले आहेत.
महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार, हे अजून स्पष्ट नाही. वरिष्ठ नेते महायुतीसाठी आग्रही असले तरी स्थानिक स्तरावर मात्र स्वतंत्रपणे लढण्याचीच मागणी जोर धरत आहे.
ऐनवेळी महायुती न झाल्यास स्वतंत्रपणे सर्व जागांवर उमेदवार उभे करता यावेत, यासाठी भाजपने प्रत्येक प्रभागात चाचपणी सुरू केली आहे. आ. राहुल ढिकले आणि शहरप्रमुख सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उमेदवार शोधणे, पडताळणे आणि निवड निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उमेदवार निवडीसाठी पक्षाने चतुःसूत्री निकष निश्चित केले आहेत
१) विजयाची क्षमता
२) प्रभागातील सामाजिक समीकरण
३) नागरिकांमधील प्रतिमा
४) पोलीस पडताळणी
यासोबतच भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमधील माहितीही निर्णायक ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांत आयारामांची संख्या वाढल्यामुळे भाजपसमोर नवा पेच उभा राहिला आहे. नव्या इच्छुकांपेक्षा पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यावर भाजप विशेष लक्ष केंद्रित करत आहे. नाशिकमध्ये राजकीय गुन्हेगारी वाढत असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला, निष्कलंक उमेदवारच अंतिम यादीत येईल, यावर भर देण्यात येत असल्याची माहिती केदार यांनी दिली.
महायुती झाली तर भाजपच्या वाट्याला किती जागा मिळणार, त्यानुसार उमेदवारांची घोषणा होईल. मात्र महायुती न झाल्यास स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची पूर्ण तयारी असल्याचेही भाजपने स्पष्ट केले आहे.


