Achieve Your Goals: ‘अडथळ्यांवर मात करत ध्येय साध्य करा’ : उद्योजक भालचंद्र पाटील

0
5

विद्यापीठात आयोजित स्टार्टअप बूट कॅम्पमध्ये प्रतिपादन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

ध्येयाचा मार्ग कधीच सरळ नसतो. परंतु अडथळ्यांवर मात करून जिद्दीने प्रयत्न केले तर निश्चित यश मिळते, असे उद्गार जळगावचे उद्योजक तथा वेगा केमिकल्सचे संचालक भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळातर्फे (केसीआयआयएल) आयोजित तीन दिवसीय स्टार्टअप बूटकॅम्प शिबिराचे उद्घाटन २० नोव्हेंबर २०२५ रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, केसीआयआयएलचे संचालक प्रा. अरुण इंगळे व नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर उपस्थित होते.

स्वतःचा ‘इन्स्पिरेशन व मोटिव्हेशन ग्राफ’ हाताळण्याचे कौशल्य प्रत्येक नवउद्योजकाने आत्मसात करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वतःचा उद्योजक ते यशाचा प्रवास सांगत उपस्थित नवउद्योजकांना प्रेरित केले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना भरारी देण्यासाठी केसीआयआयएल सातत्याने मार्गदर्शन व मदत करत आहे. नवउद्योजकांनी परिपूर्ण ज्ञान, स्पष्टता आणि मनापासूनची कमिटमेंट ठेवावी, असे ते म्हणाले. हे शिबिर २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित केले आहे. शिबिराचे समन्वयक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे व योगेश पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शिबिरात ३० नवउद्योजक सहभागी झाले. सूत्रसंचालन रोशनी जैन यांनी केले.

उद्घाटन सत्रानंतर सुप्रीम इंडस्ट्रीजचे वरिष्ठ जनरल मॅनेजर विवेक तोंड्ररे यांनी ‘आइस ब्रेकर’ व ‘उद्योजकांचे व्यक्तिमत्त्व’ विषयांवर तर छत्रपती संभाजीनगरचे रवी कोंबडे यांनी ‘संकल्पना ते सोल्यूशन फिट’ आणि ‘ग्राहक ओळख’ विषयांवर मार्गदर्शन केले. शुक्रवारी, २१ नोव्हेंबर रोजी डॉ. नवीन खंडारे, डॉ. युवराज परदेशी, श्रीकांत पाटील, उल्हास भाळे, सीए पंकज दारा आणि अक्षर गव्हाणे हे विविध सत्रांमध्ये नवउद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here