
साईमत प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी हे खर्या अर्थाने मातृहृदयी शिक्षक होते. विद्यार्थ्यांवर मातेसमान प्रेम करणाऱ्या गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात मातृप्रेमाची महन्मंगल गाथा उलगडली आहे. गुरुजींची मातृसंवेदना संत ज्ञानेश्वर माऊलींशी नातं सांगणारी होती, असे प्रतिपादन खान्देशातील साहित्यिक प्रा. बी.एन. चौधरी यांनी केले.
हे प्रतिपादन ते कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल आयोजित पूज्य साने गुरुजी कथामाले अंतर्गत चौथे पुष्प गुंफताना करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. पी. निकम हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले. संगीत शिक्षक राजू क्षीरसागर आणि विद्यार्थ्यांच्या चमूने ‘खरा तो एकची धर्म’ समूहगीत गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथामाला समिती प्रमुख डॉ. अशोक पारधे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. आर. डी. कोळी यांनी करुन दिला.
प्रा. चौधरी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मरणिका देऊन सन्मानित करण्यात आले. कथाकथनाचे पुष्प गुंफताना त्यांनी विठू माऊली, ज्ञानेश्वर माऊली आणि पूज्य साने गुरुजी माऊली अशी मातृत्वाची त्रिवेणी गुंफली. त्यांच्या कथनातून गुरुजींचे बालपण, ‘श्यामची आई’च्या संस्कार कथा, शिक्षकाची भूमिका, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शेतकऱ्यांची सेवा, समर्पण आणि शेवटी आगतिक होऊन केलेले आत्मसमर्पण असे एक तास श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील, समिती सदस्य एस. एम. पाटील, टी. टी. चौधरी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. डी. कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण पाटील यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला.
याप्रसंगी भारताच्या माजी पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेतली.


