
एरंडोल-पारोळा मार्गावरील रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोर भीषण धडक
साईमत/एरंडोल/प्रतिनिधी :
मॉर्निंग वॉक करत असताना मागून येणाऱ्या डंपरने दिलेल्या जबर धडकेत धरणगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एरंडोल-पारोळा रस्त्यावर रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोर गुरुवार दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
शिवाजी रघुनाथ महाजन (वय ४२, रा. पारोळा, ह.मु. अष्टविनायक कॉलनी, एरंडोल) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजी महाजन हे एरंडोल-पारोळा मार्गावरील रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोर मॉर्निंग वॉक करत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या डंपर क्र.(एच.आर.३८ ए.डी. ४१३६)ने त्यांना मागून जोराची धडक दिली.
या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ.राजू पाटील, अमोल भोसले आणि विजू पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात होताच डंपर चालक वाहन सोडून फरार झाला होता. पोलिसांनी डंपर जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा केले आहे.
घटनेनंतर एरंडोल शहरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. फरार डंपर चालकाचा एरंडोल पोलीस कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


