
साईमत प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणुकीत गुरुवारचा दिवस जामनेरसाठी ऐतिहासिक ठरला. अर्ज माघारीसाठी एक दिवस बाकी असताना घडलेल्या नाट्यमय घडामोडीत भारतीय जनता पक्षाच्या साधनाताई गिरीश महाजन (Sadhnaatai Mahajan) यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली. शहराच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा महाजन कुटुंबाचे वर्चस्व अधोरेखित झाले.
जामनेर (Jamner) नगरपालिकेवर राज्याचे मंत्री ना. गिरीश महाजन यांचे एकछत्री प्रभुत्व असल्याचे गेल्या निवडणुकीतच दिसून आले होते. त्यावेळी सर्व २५ पैकी २५ जागांवर भाजपचा दणदणीत विजय झाला होता. यंदाही पक्षाने जोरदार तयारी केली असून, निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडीमुळे भाजपचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे.
नगराध्यक्षपदासाठी (Binvirodh Nagaradhyaksha) साधनाताई महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीतर्फे रूपाली ललवाणी, प्रतिभा झाल्टे आणि सरिता बोरसे यांनीही अर्ज भरला होता. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी या तिघींनीही आपली उमेदवारी मागे घेतली. परिणामी साधनाताई महाजन यांच्या निर्विरोध निवडीचा मार्ग स्वच्छ झाला.
नगराध्यक्षपदाबरोबरच भाजपच्या सहा नगरसेवक पदांच्या उमेदवारांचीही बिनविरोध निवड झाली आहे. यात
• उज्वला दीपक तायडे
• सपना रवींद्र झाल्टे
• संध्या जितेंद्र पाटील
• महेंद्र कृपराम बाविस्कर
• श्रीराम महाजन
• किलुबाई जीमल्या शेवाळे
या सहा उमेदवारांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदी एक आणि नगरसेवकांच्या सहा जागा—अशा एकूण सात जागांवर भाजपने बिनविरोध विजयाची नोंद केली आहे. यामुळे जामनेर नगरपालिकेवरील भाजपची पकड आणखी मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निर्विरोध निवड जाहीर होताच जामनेर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. तर जळगाव शहरातही विजयाचा उत्साह वातावरणात जाणवत होता.
साधनाताई महाजन यांच्या बिनविरोध निवडीमुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत जामनेर पुन्हा एकदा भाजपचा गड असल्याची छाप अधोरेखित झाली आहे.


