‘Jalgaon First’ : ‘जळगाव प्रथम’ची रचनात्मक घोडदौड, शहर विकासासाठी तज्ज्ञांची एकजूट

0
5

१९ प्रभागात २ आर्किटेक्ट, ४ इंजिनियर प्रभागनिहाय जबाबदारी घेणार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या ‘जळगाव प्रथम’ उपक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिकांसह मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ॲड. बाविस्कर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आर्किटेक्ट आणि इंजिनिअर यांचे संघटित प्रयत्न आवश्यक असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. शहराला राहण्यायोग्य बनवणे ही आजची अत्यावश्यक गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट उपस्थितांना दाखविण्यात आली. जळगाव शहराचा विकास आराखडा बनविण्यासाठी १९ प्रभागात २ आर्किटेक्ट, ४ इंजिनियर प्रभागनिहाय जबाबदारी घेणार, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

मु.जे.महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी ठोस सूचना मांडल्या. त्यात क्रेडाईचे ज्येष्ठ पदाधिकारी इंजिनियर अनिश शहा यांनी जळगावच्या घसरत्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधले. २००२ मध्ये महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये जळगावचा वाटा पाच टक्के होता. सध्या तो २.५ टक्क्यांवर आला आहे. रोजगाराअभावी तरुणांचे स्थलांतर वाढत असून ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. आर्किटेक्ट राजेंद्र पारख यांनी लोकसंख्या गती विचारात घेऊन दीर्घकालीन आणि धोरणात्मक शहर नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. इंजिनियर धनंजय जकातदार यांनी प्रभावी व्यवस्थापन, आत्मस्वीकार आणि दातृत्वाची भावना शहर विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. जळगावकरांनी शहराच्या हितासाठी सैनिक वृत्तीने उभे राहिले पाहिजे, असे कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी सांगितले. रविराज पगार यांनी ‘जळगाव प्रथम’ चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी चौकाचौकात कॉर्नर सभा आयोजित करण्याचे आवाहन केले. महेश वर्मा यांनी पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधींची गरज अधोरेखित केली. नित्यानंद पाटील यांनी ‘शहराच्या यशोगाथा आणि भविष्यातील संधी’ यावर विचार मांडला.

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ‘जळगाव प्रथम’ संघटनेने शहरातील मूलभूत समस्यांवर ठोस भूमिका घेणारे मजबूत आणि पारदर्शक उमेदवार उभे करावेत, अशी ठाम मागणी उद्योजक कैलास कासार यांनी व्यक्त केली. जळगावचा विकास करायचा असेल तर या प्रश्नांवर निर्णायक पावले उचलणारे ॲड.बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार उभे केले पाहिजे, अशी कासार यांनी जोरदार मागणी केली. त्यांच्या मतांना बैठकीत उपस्थित सर्व मान्यवरांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत प्रोत्साहन दिले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सकारात्मक व ठाम भूमिका आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यांची होती उपस्थिती

बैठकीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, क्रेडाई व जळगाव सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनचे सभासद, इंजि. दीपक सराफ, इंजि.रजनीश लाहोटी, राजेश चौधरी, आर्किटेक्ट विशाल देशमुख, संजय बोंडे, संजय पाटील, सतीश कुरकुरे, महेश समदाणी, अविनाश पाटील, संदीप मांडोळे, डॉ.नितीन धांडे, आशिष सपकाळे, ईश्वर मोरे, एन.जे.पाटील, रामजी सूर्यवंशी, संजय विसपुते, माजी नगरसेवक रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here