घरफोडी करून तब्बल १३१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
साईमत/सावदा, ता. रावेर/प्रतिनिधी :
घर बंद असल्याची संधी साधत रावेर तालुक्यातील चिनावल येथे चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १३१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. निवृत्त शिक्षक राजेंद्र मुरलीधर सरोदे यांचे घर फोडून हा सर्व मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली.तुकाराम वाडीतील रहिवासी राजेंद्र सरोदे हे भावाच्या निधनानंतर मूळ गावी खडका येथे गेले होते.
विधीनंतर १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ते चिनावलला परतले असता घराचा लोखंडी दरवाजा उघडा व मुख्य लाकडी दरवाज्याची कडी तुटलेली दिसली. याबाबत त्वरित सावदा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. चोरट्यांनी याच परिसरातील हेमराज सखाराम सरोदे यांच्या बंद घरातही चोरीचा प्रयत्न केला. मात्र ते डोंबिवली येथे वास्तव्यास असल्याने घरात कोणतेही मौल्यवान सामान नसल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
घटनेचा तपास एपीआय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल सानप व हवालदार विनोद तडवी करीत आहेत. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.


