
टायगर स्कूलमध्ये विविध गीत,नाटिका,नृत्य, स्पर्धांनी बालदिन साजरा
साईमत/पारोळा /प्रतिनिधी :
येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिन सांस्कृतिक नाटिका,नृत्य,विविध स्पर्धांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते हळूहळू लोप पावत चाललेल्या पत्रलेखन या कला प्रकाराची विद्यार्थ्यांना दिली गेलेली ओळख आणि प्रत्यक्ष सराव.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रप्रेमी व आदर्श शिक्षक स.ध.भावसार,सब पोस्ट मास्टर उमेश रहण तसेच धुळे टायगर किड्स स्कूलचे संचालक भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मार्गदर्शनात भावसार यांनी आपल्या आयुष्यात लिहिलेल्या तब्बल ५१ हजार पत्रांच्या अनुभवाचा उल्लेख करत पत्रलेखनामुळे लेखन कौशल्य, अभिव्यक्तीशक्ती आणि संवाद कौशल्य अधिक प्रभावी बनते, यावर प्रकाश टाकत पत्रांचे विविध प्रकार, त्यांची रचना, योग्य शैली याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
सब पोस्ट मास्टर उमेश रहण यांनी भारतीय डाक विभागाची कार्यपद्धती, पीन कोडची रचना आणि त्याचे महत्त्व याबाबत माहिती दिली. बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी “डाकिया डाक लाया” या गीतावर आकर्षक नृत्य सादर केले.इयत्ता ३ री ते ६ वी तील विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या दुष्परिणामांवर प्रभावी नाटिका सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.यावेळी चित्रकला, वक्तृत्व आणि पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आल्या.
पत्रलेखन स्पर्धेत विजयी ठरलेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना भावसार यांच्याहस्ते प्रमाणपत्रे,रोख बक्षिस देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रम संस्थाध्यक्ष रविंद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.सूत्रसंचालन तेजश्री विसपुते, काजल सिंधी यांनी केले.यशस्वीतेसाठी प्राचार्य पि.एस.पाटील, अजीम शेख, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी,विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर, वृषाली पाटील यांनी परिश्रम घेतले.


