An Energy Self-Sufficient District : ऊर्जा स्वावलंबी जिल्हा घडविण्याकडे प्रशासनाचे पाऊल

0
5

जिल्हाधिकारी कार्यालयात सौर ऊर्जेवर आधारित शाश्वत विकास उपक्रमांवर चर्चा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जिल्ह्यातील सौर ऊर्जेवर आधारित उपक्रमांना चालना देण्यासाठी बुधवारी, १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सौर ऊर्जा व वीज व्यवस्थापन’ विषयावर सविस्तर बैठक पार पडली. यावेळी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे (कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण) यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा करून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. बैठकीत सौर ऊर्जा वापर, ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरणपूरक विकास यासंबंधी विविध योजनांचा आढावा घेतला. बैठकीला जळगाव महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता उपस्थित होते.

बैठकीतील प्रमुख मुद्यांमध्ये ‘PM Suryaghar मोफत वीज योजना’-शहरी आणि ग्रामीण भागातील घरांमध्ये सौर पॅनल स्थापनेद्वारे घरगुती वीज खर्च कमी करणे आणि हरित ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने योजनेची अंमलबजावणी गतीमान करण्यावर भर देण्यात आला. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’- शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून देण्यासाठीच्या प्रक्रियेत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’- कृषी सिंचनासाठी सौरऊर्जेवर आधारित ग्रिड प्रणाली उभारून ऊर्जास्वावलंबी शेतकरी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यावर सविस्तर चर्चा झाली. ‘स्मार्ट मीटर प्रणाली’-वीज वापराचे अचूक मोजमाप, पारदर्शक बिलिंग आणि तक्रार निवारण सुलभ करण्यासाठी स्मार्ट मीटर प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. “एक गाव -सौर गाव” उपक्रम- जिल्ह्यातील निवडक गावाला पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित ‘सोलर व्हिलेज’ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासासाठी हा पायलट प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

हरित विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

सौरऊर्जेचा वापर वाढविणे हे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक स्थैर्य यासाठी अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासन सर्व सौर योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करेल, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.
बैठकीतून जळगाव जिल्हा ऊर्जा स्वावलंबन आणि हरित विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असल्याचे प्रतिपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here