Devgiri Bank’s 5.5 Crore Fraud : देवगिरी बँकेची साडेपाच कोटींची फसवणूक : माजी खा. उन्मेष पाटलांसह चौघांवर गुन्हा दाखल

0
11

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उधाण

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :  

छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एनपीए झाले होते. बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र, या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा केला आहे.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांच्यात अलीकडेच भूखंड प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेसह अन्य एका बँकेला गंडवल्याचा आरोप केला होता. अशा आरोपाच्या अवघ्या तीन दिवसांनंतरच हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही मोठी अडचण मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here