संमेलनात रमेश कदम ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शाहिरी क्षेत्र संघटन, सार्वजनिक कार्य व पत्रकारिता अशा माध्यमातून ज्यांनी आपले आयुष्य ६० वर्षांहून अधिक काळ निरलस वृत्तीने समर्पित केले. अशा अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे संस्थापक तथा मुख्य विश्वस्त रमेश कदम यांना ‘पहिला खान्देशरत्न राष्ट्रशाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे जीवन गौरव पुरस्कार’ महाराष्ट्राच्या पारंपारिक लोकवाद्याच्या गजरात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार जळगाव खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान ह्या संस्थेच्यावतीने देण्यात आला. त्याचे स्वरूप ५१ हजार रुपयांसह शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.
जळगावातील माजी सैनिक सभागृहात अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद आणि खान्देश लोककलावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी शाहीर लोककलाकार संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात स्मितोदय फाउंडेशनच्या अध्यक्षा भैरवी पलांडे-वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जळगाव शहराचे आ.राजू मामा भोळे उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्र शाहीर सिद्राम बसाप्पा मुसाटे यांच्या प्रतिमेला माल्यार्पणासह दीपप्रज्ज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाहीर तथा अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष डॉ.शाहीर देवानंद माळी होते.
याप्रसंगी पुरस्कार प्राप्त रमेश कदम यांनी शाहीर परिषदेच्या ३५ वर्षाच्या दैदिप्यमान कामगिरीचा आढावा घेताना शाहीर लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढलेल्या जनआंदोलनाची माहिती उपस्थितांना करून दिली. आता अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद संस्थेची धुरा शाहीर देवानंद माळी, शाहीर विनोद ढगे सारख्या तळमळीने काम करणाऱ्या तरुणांच्या हातात देण्याची वेळ आली आहे. आता मी शरीराने जरी थकलो तरी मनाने व शेवटच्या श्वासापर्यंत परिषदेची धुरा सांभाळणाऱ्या युवा पिढीच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाचे अध्यक्ष शाहीर देवानंद माळी यांनी शाहीर परिषदेचे काम जोमाने पुढे नेऊन शाहिरी लोककलेच्या जतन व संवर्धनासोबतच लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी यापुढे प्रभावीरित्या परिषद कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली.
संमेलनाला राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शाहीर परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने शाहीर भिकाजी भोसले, शाहीर राणा जोगदंड, शाहीर आसनगावकर, शाहीर आप्पासाहेब उगले, शाहीर धनवटे, शाहीर खांदेभराड, शाहीर अरविंद जगताप, शाहीर आप्पा खताळ, शाहीर विश्वास कांबळे, श्रीमती नंदा पुणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनास खान्देशासह राज्यभरातील मोठ्या संख्येने लोककलावंत उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी परिषदेचे मोहित पाटील, संतोष चौधरी, भिका धनगर, आकाश भावसार, अवधूत दलाल, अरविंद पाटील, गोकुळ चौधरी आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक तथा शाहीर परिषदेचे नवनिर्वाचित प्रमुख कार्यवाह शाहीर विनोद ढगे तर आभार खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे समन्वयक शाहीर सचिन महाजन यांनी मानले.
शोभायात्रेने वेधले लक्ष…!
मराठी शाहीर लोककला संमेलनानिमित्त भव्य अशी लोककलेची शोभायात्रा काढण्यात आली. काव्यरत्नावली चौकातील “भाऊंचे उद्यान” येथे शोभायात्रेचा प्रारंभ महाराष्ट्राचे शाहीर शाहीर देवानंद माळी यांच्या हस्ते करण्यात आले. भाऊंच्या उद्यानातील राष्ट्रध्वजासमोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा देणारा खान्देशरत्न राष्ट्रशाहीर सिद्राम बसपा मुचाटे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रारंभ झाला. प्रारंभी खान्देश लोक कलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे यांनी महाराष्ट्र गीत गायले. लोककलेच्या सादरीकरणासह शोभायात्रेचा प्रारंभ झाला. शोभायात्रेत खान्देशातील शाहीर, वही गायन, वाघ्या मुरळी, गोंधळी, टिंगरी वादक आदी विविध लोककला प्रकारातील लोककलावंतानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ही शोभायात्रा पारंपरिक लोककलेचे सादरीकरण करत माजी सैनिक सभागृहात पोहोचली. त्यानंतर याठिकाणी मुख्य संमेलनाला प्रारंभ झाला.



