श्रीराम मंदिर संस्थानतर्फे पारंपरिक रथोत्सव भक्तिभावात ; २० क्विंटल फुलांनी सजला मंदिरासह रथमार्ग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
सुवर्णनगरीचे ग्रामदैवत असणाऱ्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त रविवारी, २ नोव्हेंबर रोजी पारंपरिक श्रीराम रथोत्सव मोठ्या उत्साहासह भक्तिभावाने पार पडला. १५३ वर्षांची अखंड परंपरा असलेला उत्सव यंदा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी ‘जय श्रीराम’च्या घोषात, शंखनाद आणि चौघड्यांच्या गजरात रथ हलला आणि क्षणात संपूर्ण सुवर्णनगरी प्रभू श्रीरामाच्या जयघोषात दुमदुमून गेली.
यंदाच्या रथोत्सवासाठी श्रीराम मंदिराची आणि रथाची सजावट फुलांनी केली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल तीन क्विंटल झेंडू, एक टन शेवंती आणि गुलाब फुलं तर रथासाठी दोन क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला. रथमार्गावर भक्तांनी १४ क्विंटल फुलांचा वर्षाव करत प्रभू श्रीरामांचे स्वागत केले. अशा प्रकारे २० क्विंटल फुलांच्या उधळणीने सुवर्णनगरी न्हाऊन निघाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दोन क्विंटल अधिक फुलांचा वापर झाला आहे. उत्सव अधिक आकर्षक आणि भक्तिपूर्ण झाला असल्याचे संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी सांगितले.
सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. सनई-चौघड्यांच्या मंगल सुरात, ब्राह्मणवृंदांच्या वेदमंत्रोच्चारात आणि देवादिकांच्या हस्ते रथाचे पूजन झाले. रथचक्राचे पूजन आणि कोहळे अर्पण विधीनंतर श्रीराम महाराजांच्या हस्ते महापूजन पार पडले. त्यानंतर “सियावर रामचंद्र की जय…! जय श्रीराम…! प्रभू रामचंद्र की जय…!” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेलं. सहा किलोमीटरपर्यंत पसरलेल्या रथमार्गावर भक्तांनी फुलांची उधळण करून रथाचे स्वागत केले.
आकर्षक सजावट अन् रोषणाईचा जल्लोष
प्रभू श्रीरामांच्या रथाला भगवे ध्वज, झेंडू-शेवंतीच्या माळा, आंबा-नारळाची तोरणं, उसाच्या मोळ्या आणि दिव्यांच्या उजेडात सजविण्यात आले होते. रथाचा प्रत्येक भाग चाकापासून ते कळसापर्यंत फुलांनी आणि रोषणाईने उजळून निघाला. देखण्या रथाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला तर मंदिर परिसरात भक्तिगीतांचा गजर होत राहिला.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा रथोत्सव
श्रीराम रथोत्सवाची परंपरा केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणूनही ओळखली जाते. यावेळी मुस्लिम बांधवांनी रथावर फुलांची उधळण करून स्वागत केले तर हिंदू बांधवांनी जवळच्या दर्ग्यावर चादर अर्पण करून बंधुत्वाचा सुंदर संदेश दिला. १५३ वर्षांची अखंड परंपरा यंदाही भक्ती, ऐक्य आणि आनंदाचा उत्सव ठरली. त्यामुळे संपूर्ण सुवर्णनगरी राममय वातावरणात न्हाऊन निघाले.



