Progressive Maharashtra 2025 : ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ प्रदर्शनातून जनतेपर्यंत पोहोचणार विकासाचा संदेश

0
7

साईमत प्रतिनिधी

देशात विकासाचे नवे पर्व सुरू असताना, जळगाव शहरातही प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या जनकल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ हे तीन दिवसीय भव्य प्रदर्शन सोमवार, दि. ३ नोव्हेंबर ते बुधवार, दि. ५ नोव्हेंबर दरम्यान शिवतीर्थ – जीएस ग्राऊंड, जळगाव (Jalgaon Exhibition 2025) येथे आयोजित करण्यात आले आहे.
या जनजागरण प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शासनाच्या योजनांचे एकाच छताखाली दर्शन

‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ हे केवळ एक प्रदर्शन नसून, ते शासनाच्या विकासदृष्टीचा आरसा ठरणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या सुमारे ५० पेक्षा अधिक विभागांचे आणि संस्थांचे स्टॉल्स या ठिकाणी उभारले जाणार आहेत.

यामध्ये कृषी आणि ग्रामीण विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, जैव सुरक्षा, आयुष मंत्रालय, होमियोपॅथी अनुसंधान परिषद, केंद्रीय मत्स्य पालन विभाग, भारतीय मानक ब्युरो, आयसीएमआर, राष्ट्रीय खत निगम, लघु उद्योग विकास बँक, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय विमान प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव जिल्हा प्रशासन, महापालिका तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे इनक्युबेशन सेंटर अशा विविध विभागांचा समावेश आहे.

या स्टॉल्सद्वारे नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, प्रत्यक्ष उदाहरणे आणि इंटरएक्टिव्ह सादरीकरणांद्वारे योजनांचा लाभ कसा घ्यावा, हेही स्पष्ट केले जाणार आहे.

“एक उन्नत राष्ट्र की ओर…” या घोषवाक्याखाली भरविण्यात आलेले हे प्रदर्शन ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या त्रयींचा संगम ठरणार आहे.
फ्रेंड्ज एक्झिबिशन अँड प्रमोशन (दिल्ली) या संस्थेने केंद्र सरकारच्या जनजागरण मोहिमेअंतर्गत या उपक्रमाचे मूर्त रूप दिले आहे. दररोज सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले असेल.

खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, आणि फ्रेंड्ज एक्झिबिशनच्या प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, “या प्रदर्शनातून शासनाचे उपक्रम प्रत्यक्ष अनुभवता येतील. प्रत्येक नागरिकाने याला भेट देऊन देश आणि राज्याच्या प्रगतीत भाग घ्यावा.”

नव्या पिढीतील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनात जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शोध प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जवळपास आठ शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञाननिष्ठ आणि तंत्रज्ञानाधारित प्रकल्प प्रदर्शनात प्रदर्शित केले जाणार आहेत.
उत्कृष्ट कल्पना आणि अभिनव प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे तरुणाईत विज्ञानाची ओढ वाढेल आणि ‘मेक इन इंडिया’च्या भावनेला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी, उपाध्यक्ष दीपक परदेशी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, तसेच फ्रेंड्ज एक्झिबिशनचे संचालक आनंद पाल, दीपकसिंग मेहता, साक्षी सैनी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले, “जळगावकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन शासनाच्या प्रगतीशील वाटचालीचा भाग व्हावे. हे प्रदर्शन केवळ योजनांचे नव्हे तर नागरिक-शासन संवादाचेही व्यासपीठ ठरेल.”

जळगावात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे प्रदर्शन भरविण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि जनकल्याण यांचा संगम असलेला ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ हा उपक्रम शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करणारा ठरेल.

या प्रदर्शनातून जळगावकरांना विकासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, हा उपक्रम महाराष्ट्राच्या प्रगतीशील वाटचालीतील आणखी एक प्रेरणादायी पाऊल ठरेल.

 कार्यक्रमाची रूपरेषा

ठिकाण: शिवतीर्थ (जीएस ग्राऊंड), जळगाव

कालावधी: ३ ते ५ नोव्हेंबर २०२५

वेळ: सकाळी १०.३० ते सायंकाळी ५

आयोजक: फ्रेंड्ज एक्झिबिशन अँड प्रमोशन (दिल्ली)

विशेष आकर्षण: विद्यार्थ्यांची शोध प्रकल्प स्पर्धा, शासन योजनांचे माहिती स्टॉल्स, सर्जनशील सादरीकरणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here