साईमत प्रतिनिधी
शहरातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या ऐतिहासिक रथोत्सवाचा भाग असलेला तेजोमय ‘सूर्यनारायण रथ’ याचे आगमन दिनांक ३० ऑक्टोबर रोजी जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात झाले. या आगमनाने बँकेच्या परिसरात भक्तीचा आणि उत्साहाचा माहोल निर्माण झाला.
श्रीराम मंदिर संस्थेचा हा रथोत्सव दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा जपणारा आहे. या रथोत्सवातील सूर्यनारायण रथ तेज, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी, संचालक मंडळाने आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने रथाचे स्वागत केले.
रामपेठेतून रथ मिरवणुकीस सुरुवात झाली आणि जयघोषांच्या गजरात, ढोल-ताशांच्या तालावर, ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. बँकेच्या प्रांगणात रथ पोहोचताच विधिवत पूजा, आरती आणि मंत्रोच्चार करून रथाचे स्वागत करण्यात आले. उपस्थित भाविकांनी सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
या पारंपरिक आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमामुळे जलगाव जनता सहकारी बँकेने आपल्या सांस्कृतिक सहभागाची परंपरा कायम ठेवली आहे.



