साईमत जळगाव प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आत्मनिर्भरतेचा झेंडा फडकावला आहे.
जिल्हा पातळीवर भरविण्यात आलेल्या दिवाळी मेळाव्यात तब्बल एक कोटी १८ लाख रुपयांची उलाढाल झाली असून, महिलांच्या उद्योगशीलतेला नवा वेग मिळाल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले.
या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध गावांमधील महिला बचत गटांनी एकूण २०० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारले.
या स्टॉल्सवर महिलांनी बनवलेल्या दिवाळी फराळाच्या वस्तू, सजावटी दिवे, हस्तकला साहित्य, गृहउपयोगी वस्तू तसेच कृषी उत्पादनांपासून तयार केलेली उत्पादने विक्रीस ठेवली होती.
शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांकडून या वस्तूंना मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक ग्राहकांनी “महिलांचे उत्पादन दर्जेदार आणि परवडणारे आहे” अशी प्रशंसा केली.
‘उमेद अभियान’मुळे आत्मनिर्भरतेला नवे बळ
या यशामागे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या “उमेद अभियान” चे मोठे योगदान आहे.
या अभियानांतर्गत महिलांना व्यवसायविषयक प्रशिक्षण, स्टॉल उभारणीसाठी आर्थिक मदत आणि विपणन कौशल्य याबाबत मार्गदर्शन देण्यात आले.
यामुळे अनेक महिलांना पहिल्यांदाच थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची आणि स्वतःच्या उत्पादनांची विक्री वाढवण्याची संधी मिळाली.
प्रशासनाचा सर्वांगीण पाठिंबा
या उपक्रमाला जिल्हा प्रशासनानेही सर्वतोपरी सहकार्य दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद सर्वांवर, प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, उमेद अभियानाचे व्यवस्थापक हरीश भोई, तसेच तालुका अधिकारी व सहाय्यक गट विकास अधिकारी सरला पाटील, रवींद्र सूर्यवंशी आणि स्वप्निल पाटील यांनी या मेळाव्याच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम केवळ विक्रीपुरता मर्यादित न राहता, महिलांच्या उद्योगविकासाच्या दिशेने ठोस पाऊल ठरला.
या मेळाव्यामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक फायद्यासह आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा दोन्ही मिळाली.
अनेक गटांनी यश पाहून आता वर्षभर उत्पादन आणि विक्रीसाठी नियोजन सुरू केले आहे.
महिला बचत गटांच्या या प्रयत्नांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा श्वास मिळत असून, ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला खरी गती मिळत आहे.
दिवाळी मेळाव्यातील ही उल्लेखनीय उलाढाल जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या क्षमतेचा ठसा उमटवणारी ठरली आहे.
महिलांनी या उपक्रमातून दाखवून दिलं की योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळालं तर ग्रामीण भागातही उद्योजकतेची नवी क्रांती शक्य आहे.
