“मिश्किली आणि कविता” कार्यक्रमात : ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
सातशे वर्षांची परंपरा असलेल्या मराठीचा केवळ अभिजात भाषा म्हणून ढोल न वाजवता असे मराठीपण महाराष्ट्राचे वैभव आहे. ते आपण जपले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले. आरोग्यदीप किडनी फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, जळगाव शाखा आणि व. वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मिश्किली आणि कविता” कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी दीप प्रज्ज्वलन व नायगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांनी दिवाळीनिमित्त ‘दाद आणि टिळक’ या कविता प्रारंभी सादर केल्या. महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी माय आणि नोकरी व कौटुंबिक अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांविषयी सादर केलेल्या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘मुळाक्षरांची कविता’ आणि ‘उजवे डावे’ ही कविता सादर करत कार्यक्रमाचा समारोप केला. वर्तमान परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत काही शाब्दिक कोट्या व विनोदाद्वारे श्रोत्यांना त्यांनी विचार मंथन करायला लावले.
यांची लाभली उपस्थिती
व्यासपीठावर डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. भरत बोरोले, सी. ए. अनिलकुमार शाह, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. दिनेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमास माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. राजूमामा भोळे, नंदकुमार बेंडाळे, हरीश मिलवाणी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. शशिकांत गाजरे, पाहुण्यांचा परिचय डॉ. अविनाश भोसले तर सूत्रसंचालन तथा आभार डॉ. अपर्णा भट-कासार यांनी मानले.



