पं. दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाने सामाजिक कार्याची घेतली दखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भगीरथ शाळेचे उपक्रमशील शिक्षक आर. डी. कोळी यांना पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, वृंदावन (उत्तर प्रदेश) तर्फे मानद डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भव्य सोहळ्यात मुख्य पाहुणे पद्मश्री डॉ. अरविंद कुमार (मध्य प्रदेश) यांच्या हस्ते हा सन्मान कोळी यांना बहाल करण्यात आला. पदवीदान समारंभात देशभरातील विविध क्षेत्रातील कर्मवीरांचा गौरव करण्यात आला. शिक्षण, साहित्य, समाज प्रबोधन तसेच सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आर. डी. कोळी यांना ही मानद पदवी देण्यात आली आहे.
डॉ. कोळी यांनी अनाथ, आदिवासी, दलित, बेघर व भिकारी अशा समाजातील वंचित घटकांसाठी तन, मन, धनाने मोलाचे कार्य केले आहे. “समाजाचे देणे लागतो” या भावनेतून त्यांनी केलेल्या सेवाकार्याची दखल विद्यापीठाने घेतली. यापूर्वीही कोळी यांना आदर्श समाजसेवक, आदर्श शिक्षक, हौशी कवी अशा विविध क्षेत्रांतील ५० हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
डॉ. कोळी यांच्या यशाबद्दल खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चांदसरकर, मुख्याध्यापक एस. पी. निकम, डॉ. अशोक पारधे, समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे मानसपुत्र डी. बी. महाजन, ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर, भास्करराव चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.



