त्रिपदी परिवार शाखेतर्फे भक्तिभावाने उजळले मंदिर
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
शहरातील कुलकर्णी प्लॉटमधील नाना महाराज तराणेकर यांच्या मंदिरात त्रिपदी परिवार शाखेतर्फे धनत्रयोदशी आणि गुरुद्वादशी ह्या पवित्र योगावर बाबा महाराज तराणेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वा दत्तयाग नुकताच पार पडला. हा योगायोग नाना महाराजांच्या कृपेने घडून आला. यजमानांनी श्रीराम राजूरकर यांच्या पौराहित्यानुसार आहुती देऊन समारंभ पार पडला. हा धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव भाविकांसाठी अत्यंत स्मरणीय ठरला. त्यामुळे मंदिर परिसर भक्तिभावाने उजळून निघाला.
याप्रसंगी परिवारातील वंदना गालफडे, श्री व सौ. यावलकर, मंगला अशोक पुराणिक, सुरेश घन, वासुदेव इंगळे, श्री.भोळे, सुजाता पुराणिक यांच्यासह संपूर्ण त्रिपदी, मित्र परिवार तसेच गुरुबंधू उपस्थित होते. समारंभात घोरकष्टोरण स्तोत्र म्हणून आहुती देण्यात आली. आरती, नैवेद्य दाखवल्यानंतर भाविकांना साबुदाणा खिचडी व प्रसादाचे वाटप करण्यात आले. अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात दत्तयाग झाला. यजमान श्री व सौ. भालचंद्र अशोक पुराणिक यांना नुकताच श्रीमद् प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्या समाधी स्थळी गरूडेश्वर येथे दत्तयाग आहुती योग आला होता. लगेच त्यांचे परमशिष्य नाना महाराजांच्या मंदिरात हा पवित्र योग आला.