नवोपक्रम, स्वदेशी संशोधनासह आत्मनिर्भर भारतासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ लालजी नारायणजी सावरकर (ला.ना.सा.) विद्यालयात केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार “विकसित भारत बिल्डथॉन–२०२५” राष्ट्रीय संशोधन स्पर्धेबाबत थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. भैय्यासाहेब गंधे सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळेत एलसीडी प्रोजेक्टरद्वारे केंद्र सरकारचा कार्यक्रम दाखविण्यात आला. उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमशीलता, सर्जनशीलता, संशोधनवृत्ती आणि दैनंदिन गरजा स्वदेशी तंत्रज्ञानातून पूर्ण करण्याची क्षमता विकसित करणे होता.“विकसित भारत बिल्डथॉन–२०२५” उपक्रम केंद्रीय शिक्षण मंत्रालय, अटल इनोव्हेशन मिशन आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारताच्या धर्तीवर आयोजित केला आहे. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना संशोधन आणि नवकल्पना क्षेत्रात प्रोत्साहन देणे हा यामागचा हेतू आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी एजाज शेख उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून संशोधन क्षेत्रातील संधींबद्दल माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारत, “व्होकल फॉर लोकल”, स्वदेशी विकास आणि राष्ट्रीय समृद्धी या संकल्पनांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बिल्डथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने संशोधन व नवोपक्रमात योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे समन्वयन उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे तसेच मार्गदर्शक शिक्षक पंकज खंडाळे, हिंमत काळे यांनी केले. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.