‘सूर चैतन्य’ दिवाळी पर्वातील एक अनुभव संपन्न पर्व ठरणार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
यंदाही “साईमत परिवारा”तर्फे सांगितीक मेजवानीचा आस्वाद घेत एकूणच जळगावकारांची दिवाळी मनोरंजनात जाणार आहे. दिवाळी म्हणजे केवळ प्रकाश… उत्सव… किंवा फराळाचा सोहळा नाही, तर ती आपल्या संस्कृतीतील एक गूढ, पवित्र आणि संवेदनशील जाणीव आहे. हीच दिवाळी जेव्हा पहाटेच्या नीरव शांततेत संगीताच्या सुरांनी सजते, तेव्हा ती एक सांस्कृतिक अनुभूती देणारी पर्वणीच ठरते…! सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी सहकार्य करणारा परिवार म्हणजे ‘साईमत’ परिवार आहे. प्रसिद्ध कलावंत तथा सेलिब्रिटी अँकर (निवेदक) तुषार वाघुळदे प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा ७ स्ट्रिंग्स
प्रस्तुत “ सूर चैतन्य “ हे दिवाळी पर्वातील यंदाचे असंच एक अनुभव संपन्न पर्व ठरणार आहे. जळगाव शहरातील शिंदे नगर, सूर्या अपार्टमेंटचे प्रशस्त प्रांगण, आर.एल.कॉलनीजवळ पिंप्राळा येथे बुधवारी, २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता ‘दिवाळी पहाट’ सुश्राव्य संगीताची मैफिल रंगणार आहे.
दीपोत्सवातील ‘दिवाळी पहाट’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर संस्कृती आणि अध्यात्माचा उत्सव आहे. खरंच वर्षभराच्या गोंधळातून, धकाधकीच्या जीवनातून निवांत, सुरेल पहाट अनुभवण्याचा हा क्षण जळगावकर संगीत-कला प्रेमींच्या मनात एक नवी अनुभूती व उत्साह नक्कीच निर्माण करेल…! सकाळचे रम्य आणि आल्हाददायक वातावरण…! रसिक-प्रेक्षकांना एक वेगळी मेजवानी देऊन जाणार आहे. मधुर सुरांनी सजलेली, भक्तीच्या सुवासाने दरवळलेली आणि आधुनिकतेच्या झंकाराने ही पवित्र सकाळ उजळणार आहे. प्रसिद्ध भजन गायक तथा कलावंत नारायण ओझा, गायिका भानुप्रिया ठाकूर आणि गायक जयेश चौधरी यांचे भक्तिरसपूर्ण प्रस्तुती प्रेक्षकांना मेजवानीच ठरणार आहे.
भक्तिसंगीत, भावगीत आणि काही निवडक हिंदी भक्तिगीते आदी संगीताचा संगम रसिकांसाठी पर्वणी ठरणारा असाच असणार आहे.संकल्पना, निवेदन व संगीत संयोजन तुषार वाघुळदे यांचे असेल. साथसंगत नितीन पाटील, शुभम चव्हाण, जयंत महाजन, किशोरी राणे (वाघुळदे) यांची असणार आहे. अशा सांगीतिक मैफिलीचे बहारदार आणि विशेष शैलीत निवेदन तुषार वाघुळदे, किशोरी राणे (वाघुळदे) हे करणार आहेत.
रसिक-प्रेक्षकांसह परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
हा संगीतमय कार्यक्रम विनामूल्य आहे. रसिक-प्रेक्षक आणि परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘साईमत’ परिवाराने केले आहे. प्रसिध्द भजन गायक नारायण ओझा, नव्या दमाची गायिका टी. भानुप्रिया आणि जयेश चौधरी यांच्या सुरेल स्वरांनी सजलेल्या दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमास रसिक-प्रेक्षक आणि परिसरातील सुजाण नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.प्रमोद बऱ्हाटे, सौ.सुरेखा बऱ्हाटे, श्री.परेश बऱ्हाटे यांनी केले आहे.