District Secondary Teachers’ : जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीतील गैरप्रकारांवर संतप्त सभासदांचा आवाज ; आंदोलनाचा इशारा

0
3

मागण्यांचा विचार न केल्यास जिल्ह्याभरातील सभासद तीव्र जनआंदोलन छेडणार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील विविध नियमबाह्य आणि वादग्रस्त निर्णयांविरोधात सभासदांचा संताप वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्र. ह.दलाल, पी. एस.सोनवणे, शुद्धोधन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेचे अधीक्षक सुनील महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या विचारात न घेतल्यास जिल्ह्याभरातील सभासदांकडून तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा तुळशीराम सोनवणे यांनी दिला आहे.

पतपेढीच्या नवीन इमारतीमधील सभागृहाला “छत्रपती शिवाजी महाराज सभागृह” नाव देण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. अशा मागणीचे निवेदन अधीक्षकांना सादर केले. गेल्या २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मासिक सभेत आयत्यावेळी मंजूर केलेल्या एका ठरावाविरोधातही आवाज उठवण्यात आला. ठरावाअंतर्गत माजी अध्यक्ष यांचा मोठा छायाचित्र (फोटो) दर्शनी भागात लावण्यात आलेला आहे. मात्र, त्यांच्या कार्यकाळात अपहारासंदर्भातील तक्रारी सध्या सहकार न्यायालयात प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर असा फोटो लावणे म्हणजे भविष्यात पतपेढी कोणते आदर्श उभे करणार आहे. याबद्दल संभ्रम निर्माण करणारे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

सद्यस्थितीत महापुरुषांचे फोटो कार्यालयीन अधीक्षकांच्या बंदिस्त खोलीत ठेवलेले आहे. ते सन्मानाने दर्शनी भागात लावण्याची मागणी मुख्य तक्रारदार विनोद महेश्री यांनी केली आहे. सेवानिवृत्त माजी अध्यक्षांची पतपेढीच्या कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यात येऊ नये, पतपेढीच्या विविध पदांवर माजी अध्यक्ष, संचालक यांची सेवानिवृत्तीनंतर कोणतीही नेमणूक करण्यात येऊ नये, अशी मागणीही निवेदनात नमूद केली आहे. त्यांच्याविरोधात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे लक्षात घेता, त्यांच्या पुन्हा कार्यलक्षी संचालक वा इतर पदांवरील नेमणुकीने व हस्तक्षेपामुळे सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल.

कार्यालयीन अधीक्षक सुनील महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार पतपेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ॲक्सेस आजही माजी अध्यक्षांकडे असल्याची बाब समोर आली आहे. हे अधिकार तत्काळ विद्यमान अध्यक्ष सोनम शिवाजी पाटील यांच्याकडे देण्यात यावेत, अशी मागणी सुरेश सिताराम अहिरे यांनी सभासदांच्या स्वाक्षऱ्या घेऊन स्वतंत्र निवेदनाद्वारे केली. कार्यालयात कार्यालयीन वेळेनंतर होणारी खासगी कार्यक्रमांची चौकशी करावी, ते तात्काळ बंद करावे. कार्यालयीन वेळेनंतर पतपेढीच्या कार्यालयात काही विशिष्ट सभासदांकडून वाढदिवसासारखे खासगी कार्यक्रम साजरे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गोपनीयता भंग होण्याची भीती निर्माण झाली आहे. भविष्यात घडणाऱ्या कुठल्याही अनुचित प्रकारास विद्यमान संचालक मंडळ, अधीक्षक जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशारा डॉ. मिलिंद बागुल यांनी दिला आहे.

सभासदांच्या उपस्थितीने निवेदन सादर कार्यक्रमात उत्स्फूर्तता

निवेदन देतेवेळी माजी उपाध्यक्ष पी.एस. सोनवणे, माजी संचालक प्रा. ह. दलाल, समन्वय समितीचे मार्गदर्शक डॉ. मिलिंद बागुल, कार्याध्यक्ष पी.ए. पाटील, अनिल चव्हाण, अनिल अहिरे, संतोष कचरे, सुरेश अहिरे, डॉ.संजू भटकर, शरद पाटील, के.वाय. फराटे, पी.बी. गायकवाड, अनिल मनोरे, विनोद महेश्री, पी.बी. नरवाडे, प्रेम झंवर, सुभाष न्हाळदे यांच्यासह सभासद उपस्थित होते. सभासदांच्या विविध मागण्यांचा योग्य तो विचार न केल्यास, जिल्ह्याभर आंदोलन छेडण्यात येईल, असा पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे. आगामी काळात पतसंस्थेतील कार्यपद्धती त पारदर्शकता येणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here