वाचन : आत्मचिंतन, संवेदनशीलता अन् विवेक जागवण्याचा मार्ग
दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.
आपल्या संस्कृतीत वाचन हा एक पवित्र संस्कार आहे. ज्ञानाचे, विचारांचे आणि संस्कारांचे बीज रोवणारी ही परंपरा आजच्या डिजिटल युगात अधिक जपण्याची गरज आहे. वाचन हे फक्त माहिती मिळवण्याचे साधन नसून ते आत्मचिंतन, संवेदनशीलता आणि विवेक जागवण्याचा मार्ग आहे. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य म्हणजे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती. त्यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रेरित केले की “Dream, Read, and Act” म्हणजेच स्वप्ने पाहा, वाचा आणि कृती करा…! म्हणूनच हा दिवस फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नसून, तो ज्ञान, संस्कार आणि विचारांच्या जागृतीचा उत्सव आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आपण “वाचक” या संकल्पनेपासून दूर जातो आहोत. वाचन हे केवळ छंद नाही, तर ते मनाच्या विकासाचे, विचारांच्या घडणीचे आणि संस्कारांच्या निर्मितीचे माध्यम आहे. वाचक समाज हा नेहमी जागरूक, सर्जनशील आणि जबाबदार असतो. दररोज काही वेळ स्वतःसाठी, आपल्या विचारांसाठी आणि चांगल्या पुस्तकांसाठी राखून ठेवला, तर आपली विचारसंपदा आणि दृष्टिकोन नक्कीच अधिक समृद्ध होतो.
वाचनातूनच आपल्याला भाषेचा गोडवा, इतिहासाचा गाभा, विज्ञानाची जिज्ञासा आणि साहित्याची सृजनशक्ती जाणवते. एखादे पुस्तक म्हणजे एक “शब्दसंपन्न गुरु” असतो जो निःस्वार्थपणे ज्ञान देतो, मनाला दिशा दाखवतो. पण आजची परिस्थिती चिंताजनक आहे. टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी जाऊन वाचन संस्कृती हरवते आहे. अनेकांना एक पानही एकाग्रतेने वाचता येत नाही. त्यामुळे शब्दसंपत्ती कमी होते, विचार क्षीण होतात, आणि संवेदना हरवतात. या पार्श्वभूमीवर “जपू या वाचन संस्कृती, हीच काळाची गरज” ठरते.
वाचनातून व्यक्ती विचारशील, सजग आणि संवेदनशील बनते. शाळांमध्ये वाचनालये, पुस्तक प्रदर्शन, ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रम, वाचन स्पर्धा यांसारख्या उपक्रमांनी मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढवता येते. पालकांनीसुद्धा मुलांशी वाचनाचा संवाद साधावा, कथा वाचून त्यावर चर्चा करावी. शिक्षकांनी वर्गात ‘वाचनाचा आनंद’ हा धडा शिकवावा. वाचनामुळे कल्पनाशक्ती विस्तारते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनमूल्ये आत्मसात होतात. जसे शरीरासाठी अन्न आवश्यक असते तसेच मनासाठी वाचन हे अन्न आहे.
आजच्या पिढीला ‘स्क्रोल’ करण्याऐवजी ‘वाचणे’ शिकवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. कारण पुस्तक हे फक्त अक्षरांचे घर नसते, ते मनाचे आरसे असते.
– सौ. भाग्यश्री पंकज तळेले
प्रगती माध्यमिक शाळा, जळगाव.