सर्पमित्राने सापाला जीवदान देऊन नैसर्गिक अधिवासात सोडले
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील कुसुंबा परिसरात पुन्हा एकदा दुर्मीळ भारतीय अंडी खाणाऱ्या सापाचा शोध लागल्याने स्थानिकांमध्ये उत्सुकता आणि थोडी भीती दोन्ही पसरली होती. हा दुर्मीळ प्रजातीचा साप सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडल्याबद्दल सर्पप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांनी कौतुक केले आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील स्टेट बँकेच्या मागील भागातील एका रहिवाशाच्या घरात रात्री घरात साप आढल्याची माहिती सर्पमित्र मंदार वाढे यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अत्यंत कुशलतेने सापाला पकडून कोणतीही हानी न करता नैसर्गिक अधिवासात सोडले. हा साप भारतीय “एग ईटर” म्हणून ओळखला जातो. तो विषारी नसून माणसाला धोका पोहोचवत नाही. परंतु त्याच्या दुर्मीळतेमुळे त्याचे पर्यावरणीय महत्त्व जास्त आहे. काही वर्षांपूर्वी या सापाची नोंद केवळ विदर्भातील अमरावती परिसरात झाली होती. अलीकडील काळात जनजागृतीमुळे जळगाव परिसरात अशा दुर्मीळ प्रजातींच्या सापांची उपस्थिती अधिक स्पष्ट झाली आहे.
स्थानिक जैवविविधतेसाठी सकारात्मक संकेत
“एग ईटर” सापाची शिकार करण्याची पद्धत विलक्षण आहे. तो लहान पक्षांची अंडी गिळतो आणि त्याच्या जबड्याच्या वरच्या हाडाच्या फुगीर भागाद्वारे अंड्याला फोडतो. अंड्यातील द्रव पोटात जातो तर कवच बाहेर टाकले जाते. ही नैसर्गिक प्रक्रिया सर्पप्रेमींसाठी अभ्यासाचा विषय ठरते. ज्येष्ठ सर्पतज्ज्ञ नीलम कुमार खैरे यांच्या मते, या सापाची भारतात फारशी नोंद नाही. त्यामुळे जळगाव परिसरात असा दुर्मीळ साप आढळणे हा स्थानिक जैवविविधतेसाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.