मनपाच्या फंडातून उभे राहिले १५ विद्युत पोल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनी नगर ते सावखेडा मेन रस्त्यावर पथदिवे नसल्याने महिलांना आणि नागरिकांना रात्री पायदळ येताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पिंप्राळ्याकडून येताना रस्त्यावर अंधारामुळे अपघातांचा धोका निर्माण होत होता. पावसाळ्यात जवळच्या मोठ्या नाल्यामुळे दुचाकीस्वारांसह काही नागरिक जखमी झाले होते. अशातच आता सोनी नगर ते सावखेडा रस्ता ‘प्रकाशमय’ झाला आहे. मनपाच्या फंडातून १५ विद्युत पोल उभे केले आहेत.
यासंदर्भात स्थानिकांनी अनेकवेळा महावितरण आणि मनपा प्रशासनाकडे निवेदन दिले होते. पण दुर्लक्ष होत असल्याने वर्तमानपत्रात याबाबत बातम्या छापल्या होत्या. त्याची दखल घेत मनपाने आपला निधी वापरून रस्ता प्रकाशयोजनेवर कार्यवाही केली. विद्युत विभाग प्रमुख संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटदार मयूर चौधरी यांनी १५ विद्युत पोल उभे केले आहेत. या उपक्रमामुळे सोनी नगर, गणपती नगर, ओमकार पार्क, अथर्व रेसिडेन्सी, श्रीराम नगर, बाबुराव नगर आणि विजय नगर परिसरातील नागरिक आता सुरक्षितपणे अंधारात पायदळ ये-जा करू शकतात. पथदिवे लावल्यामुळे नागरिकांना सुरक्षितता मिळाली आहे. मनपाचे हे पावले कौतुकास्पद असल्याचे सोनी नगरातील रहिवासी नरेश बागडे यांनी सांगितले.
मनपा फंडातून १५ विद्युत पोल
मनपाच्या फंडातून पाच लाख ९२ हजार रुपये मंजुर करून सोनी नगर ते सावखेडा मेन रस्त्यावर १५ विद्युत पोल उभे केले आहेत.