आरोग्य संजीवनी वेलनेस सेंटरच्या उपक्रमाला महिलांचा प्रतिसाद
साईमत/जळगाव/प्रतिसाद :
चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढलेले वजन कमी करणे आणि शरीर-मन तंदुरुस्त ठेवणे या उद्देशाने आरोग्य संजीवनी वेलनेस सेंटरतर्फे सोनी नगरात मोफत योगा वर्गाचे उद्घाटन रविवारी सकाळी ६.३० वाजता केले. कार्यक्रमात जागतिक आरोग्य सल्लागार आदिनाथ खेडकर यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले.
योगामुळे लवचिकता वाढते, ताण कमी होतो, झोप सुधारते आणि एकाग्रता वाढते. नियमित योग केल्याने शारीरिक तंदुरुस्ती, भावनिक संतुलन आणि मानसिक स्पष्टता येते. त्यामुळे एकंदरीत आरोग्य सुधारते, असे जागतिक आरोग्य सल्लागार रेणुका खेडकर यांनी महिलांना प्रशिक्षण देतांना सांगितले.योगा वर्गाचे उद्घाटन होताच पहिल्याच दिवशी ३० महिलांनी सहभाग घेतला. हा वर्ग पहाटे ५.३० ते ६.३० या दररोजच्या वेळेत चालणार आहे. दररोज योगा केल्याने बीपी, शुगर, थायरॉईड, पी.सी.ओ.डी., सांधेदुखी, मायग्रेन, पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, कोलेस्ट्रॉल आणि भूक न लागणे यासारखे आजार सुधारतात. तसेच योगासह योग्य आहार व व्यायामामुळे निरोगी जीवनासाठी मदत मिळते.
योगामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास लाभ
योगा वर्ग कोठारी नगर, हरिविठ्ठल, सोनी नगर येथे मोफत सुरु ठेवण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी विनोद निकम, प्रकाश बोथकर, सरदार राजपूत, यशवंत पाटील, नरेश बागडे, नारायण येवले यांच्यासह महिला उपस्थित होत्या. योगाद्वारे महिलांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.