आयुक्तांच्या हस्ते ‘आनंद नगरी’ कार्यक्रमाने सप्ताहाचा समारोप
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
महानगरपालिका आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गंत संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात १ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान जागतिक बेघर दिन सप्ताह विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. उपक्रमाचे मार्गदर्शन मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त पंकज गोसावी, शहराध्ययन व्यवस्थापक गायत्री पाटील तसेच मंडळाचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी केले. सप्ताहात दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. २ ऑक्टोबरला गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती विशेष कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
३ व ४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण निवारा केंद्राची स्वच्छता व साफसफाई मोहीम राबविण्यात आली. ५ व ६ ऑक्टोबर रोजी बेघर लाभार्थ्यांचे विविध भागात सर्वेक्षण करण्यात आले तर ७ व ८ ऑक्टोबरला लिंबू चमचा, संगीत खुर्ची, दांडिया व सांस्कृतिक स्पर्धा रंगल्या. ८ ऑक्टोबर रोजी संजय गांधी योजना व इतर शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. ९ ला र्निजंतुकीकरण मोहीम व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. सप्ताहाचा समारोप १० ऑक्टोबर रोजी बेघर दिनानिमित्त “आनंद नगरी” कार्यक्रमाने झाला. फुगे, पताका आणि केक कापून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. संपूर्ण आठवडा सामाजिक संवेदनशीलता, स्वच्छता आणि कल्याण भावनेने उजळला. उपक्रमासाठी व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक राजेंद्र मराठे, हर्षल वंजारी, शितल काटे, किरण मोरे आदींनी परिश्रम घेतले.