Sister And The Brother : चुलत बहिणीचा जीव वाचवला अन्‌ भावाने दोन्ही हात गमावले

0
12

मेहरूण परिसरातील घटना ; जखमी भावावर जळगावात उपचार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

“बहिणीला काही होऊ नये” अशा भावनेने क्षणाचाही विचार न करता आपल्या चुलत बहिणीचा जीव वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या अजय सोनवणे ह्या तरुणाने आपल्या दोन्ही हातांचा त्याग केला आहे. जळगाव शहरातील मेहरूण परिसरात घडलेली हृदयद्रावक घटना ऐकून परिसरातील नागरिक भावूक झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या २१ सप्टेंबर रोजी अजय सोनवणे आपल्या कुटुंबासोबत घरात होता. त्याची केवळ सात वर्षांची चुलत बहीण घराच्या छतावर गोधडी सुकविण्यासाठी गेली होती. गोधडी टाकताना तिचा हातावरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विजेच्या तारांजवळ गेला. ही बाब लक्षात येताच अजयने क्षणाचाही विलंब न करता तिचा जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. त्याने लोखंडी रॉडच्या साहाय्याने बहिणीला तारांपासून दूर लोटले. तिचा जीव तर वाचला, पण अजयच्या हातात तीच रॉड लागल्याने त्याला प्रचंड विद्युत धक्का बसला. काही क्षणातच तो गंभीर जखमी झाला आणि बेशुद्धावस्थेत खाली कोसळला. परिवाराने तातडीने त्याला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याने अजयला पुन्हा जळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, दोन्ही हातांवरील भाजलेल्या जखमा गंभीर असल्याने अखेर डॉक्टरांना त्याचे दोन्ही हात कापावे लागले. ही शस्त्रक्रिया गेल्या सोमवारी, ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

‘अजय’ला आर्थिक मदतीसाठी नागरिकांकडून चळवळही सुरू

सध्या अजयची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला विशेष देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांकडून अजयसाठी आर्थिक मदतीची चळवळही सुरू केली आहे. स्थानिक सामाजिक संघटनांनी शासनाने धाडसी तरुणाला विशेष आर्थिक मदत द्यावी आणि त्याच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.

अजय ठरला ‘मानवतेचा हिरो’

ज्या क्षणी चुलत बहिणीचा जीव धोक्यात होता, त्या क्षणी स्वतःचा विचार न करता तिला वाचविणाऱ्या अजय सोनवणेने खऱ्या अर्थाने ‘मानवतेचा हिरो’ बनून दाखवले आहे. त्याचे हात गेले असले तरी त्याच्या निस्वार्थ त्यागाने संपूर्ण समाजाचे हृदय जिंकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here