२५ सहकाऱ्यांसमवेत ४०० सभासदांच्या उपस्थितीत ठराव मंजूर
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाच्या जामनेर शाखेचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नारायण (पं.ना.) पाटील यांनी आजारपणासह वयामुळे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. संस्थेची दोन कोटींची वास्तू असून शिलकी रक्कम आहे. गेल्या ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या त्रैमासिक सभेत मावळते अध्यक्ष पं.ना.पाटील यांनी वीस वर्षांपासून कार्यरत अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तो सभेत मंजूर करून घेतला. त्यामुळे त्यांच्या जागी प्रल्हाद भोजू (प्र.भो.) चौधरी यांचे अध्यक्षपदासाठी नाव घोषित करून ठराव मंजूर करून घेतला. ५ ऑक्टोबर रोजीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत पुणे म.पे.असोसिएशनच्या नाशिक विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा उपाध्यक्ष सदाशिव नारायण सोनवणे यांची सभाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या २५ सहकाऱ्यांसमवेत ४०० सभासदांच्या उपस्थितीत ठराव मंजूर करून घेतला. त्यामुळे जामनेर शाखेच्या तालुकाध्यक्षपदी प्र.भो.चौधरी यांची निवड जाहीर करण्यात आली.
गेल्या २० वर्षांपासून पं.ना.पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी शून्यातून संघटना उभी करून संघटनेचे उत्कृष्ट काम पाहिले. त्यामुळे राज्यभर संघटनेचे कौतुक झाले. निवृत्तांच्या वर्गणीतून त्यांनी आणि सहकाऱ्यांनी जागा घेऊन जामनेर शहरातील शिवाजीनगरात भव्य दिव्य दुमजली वास्तू उभी केली. त्यासाठी त्यांचे सहकारी कै.ना.का.शिंदे, स्व. एल.टी.पाटील, जामनेरचे गटसचिव स्व.डी.पी. बाविस्कर, स्व.द.तु.गवळी, स्व.भा.द.पाटील, सोनाळ्याचे पी.एस.पाटील, प्र.भो.चौधरी, लीलाधर धांडे, उपाध्यक्ष भागवत दौलत बोंडे, सर्कल बंडू आप्पा रामचंद्र पाटील आदींचे सहकार्य लाभले. शिवाय अवचित पाटील, ना.ना.लामखेडे, डी.एस.पाटील, सरचिटणीस प्रल्हाद रामधन बोऱ्हाडे, फत्तेपुरचे उपाध्यक्ष बी.आर.पाटील यांच्यासह सर्व कार्यकारी मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. महाराष्ट्र राज्य निवृत्तांचे आराध्य दैवत तथा केकतनिंभोराचे स्व. दा.शा.आप्पा पाटील यांनी केलेल्या वृक्षाचे रुपांतर वटवृक्षात झालेले पाहण्यास मिळत आहे. ही सर्व त्यांचीच प्रेरणा आहे. त्यामुळे सरकार दरबारी प्रश्न सुटत असतात.
संस्थेत १८ वर्षांपासून कार्यरत, सर्वांचे बळ पाठीशी
जामनेर तालुका निवृत्त सेवा संघाचे निवड झालेले नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष प्र.भो.चौधरी हे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. सर्वांना सोबत घेऊन कार्य करून घेणारे आहेत. त्यांना सेवेत असतांनापासूनचा दीर्घकाळाचा अनुभव आहे. शिवाय संस्थेत ते १८ वर्षांपासून काम करीत आहे. सदस्य, गटाध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष आणि आता अध्यक्ष अशी त्यांची वाटचाल आहे. त्यांच्या पाठीशी अधिकारी, पदाधिकारी, राजकीय पाठबळ, मित्र परिवाराचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.