Dr. Ulhas Patil : निरोगी जीवनशैली जोपासण्याचा ‘खेळ’ प्रभावी मार्ग : डॉ. उल्हास पाटील

0
12

एसएनडीटी विद्यापीठ, डॉ. वर्षा पाटील गृहविज्ञान महाविद्यालयातर्फे क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या आहेत. त्या शारीरिक विकास घडवून आणतात. खेळ खेळताना मैदानात टीमवर्क, उत्साह, नियोजनासह कमालीचा संयम महत्वाचा ठरत असतो. खेळ ही केवळ स्पर्धा नसून एकत्र येण्याचा, संघभावना वाढवण्याचा आणि निरोगी जीवनशैली जोपासण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केले.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव आयोजित क्रीडा स्पर्धांचे बुधवारी, ८ रोजी जळगाव येथे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी डॉ. उल्हास पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा रस्सीखेच असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. कविता खोलगडे, डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या कविता देशमुख, प्राचार्या डॉ. नीलिमा वारके, डॉ. विजयकुमार पाटील, गोदावरी इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून महर्षी धोंडो कर्वे, देवी सरस्वती आणि गोदावरी आजी पाटील यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केले. हवेत फुगे सोडून आणि मैदानात फीत कापून व्हॉलीबॉल मुक्त करीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. नीलिमा वारके यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश सांगून दरवर्षी स्पर्धा घेण्यात येतील, असे सांगितले. तसेच डॉ. कविता खोलगडे यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्राजक्ता पाटील यांनी केले.

स्पर्धेत २४ संघाचा सहभाग

स्पर्धेत राज्यभरातून २४ संघ सहभागी झाले आहेत. त्यात नागपूर, सांगली, अकलूज, शहादा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, पैठण, सातारा, जुहू, चाळीसगाव तसेच मुंबईतील विविध संघांचा समावेश आहे. स्पर्धेत बुधवारी दुपारी विविध संघात व्हॉलीबॉल, तायक्वांदो आणि रस्सीखेच खेळांचे सामने रंगतदार अवस्थेत झाले. स्पर्धेत प्रत्येक महिला खेळाडूने आपले कसब पणाला लावून संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here