खुबचंद सागरमल विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
वन्यजीवांच्या अभ्यासातून औषधी संशोधनांना दिशा मिळते. पर्यटनाला चालना मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. त्यामुळे पर्यावरण संतुलनाची ‘वन्यजीव संरक्षण’ गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी लक्ष्मीकांत महाजन यांनी केले. खुबचंद सागरमल विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेतर्फे वन्यजीव सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना ‘वन्यजीवांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज’ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
वन्यजीव म्हणजे निसर्गात स्वाभाविकरित्या राहणारे प्राणी, पक्षी, मासे, कीटक आणि इतर जीव. हे सर्व पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत.अन्नसाखळी व अन्नजाळीद्वारे पर्यावरणातील संतुलन राखतात. वाघ, सिंह यांसारखे शिकारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात तर शाकाहारी प्राणी वनस्पतींची वाढ संतुलित ठेवतात. त्यामुळे संपूर्ण निसर्गचक्र सुरळीत चालते. मधमाशा, फुलपाखरे आणि पक्ष्यांच्या परागीभवनामुळे शेतीला हातभार लागतो तर काही प्राणी बियाणे पसरवून झाडांची वाढ सुनिश्चित करतात, असे सांगत महाजन यांनी वन्यजीवांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले.
महाजन यांनी भारतीय संस्कृतीतील प्राण्यांना दिलेल्या पवित्र स्थानाचा उल्लेख करून वन्यजीव संवर्धन आपल्या अस्तित्वाशी निगडित असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे, पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख प्रवीण पाटील, विजय पवार यांच्यासह हरीत सेनेचे सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते.