‘Vyasanmukti Var Bolu Kahi’ : महाराष्ट्रातील व्यसनमुक्तीच्या कार्याला ‘व्यसनमुक्तीवर बोलू काही’ पुस्तकाचे बळ मिळणार

0
19

डॉ. प्रकाश आमटे यांचा आशावाद ; डॉ. नितीन विसपुते लिखित पुस्तकाचे प्रकाशन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

जळगावातील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते लिखित “व्यसनमुक्तीवर बोलू काही” पुस्तकात सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत व्यसनमुक्तीविषयी उपयुक्त माहिती आणि प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती कार्याला नक्कीच बळ देईल आणि जनजागृतीस हातभार लावेल, असा आशावाद डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केला. व्यसनमुक्त राहण्यासाठीचा संदेश देताना त्यांनी आपल्या अनुभवातून प्रेरक विचार मांडले. पुस्तकाचे अवलोकन केल्यानंतर ते बोलत होते.

समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर उपाय शोधत, जनजागृतीचा दीप पेटवणारे जळगावातील चेतना व्यसनमुक्ती केंद्राने आणखी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते लिखित “व्यसनमुक्तीवर बोलू काही” पुस्तकाचे लोकार्पण पद्मश्री तथा मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी हेमलकसा येथे करण्यात आले. सोहळ्याला चेतना विसपुते, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनीषा महाजन, ज्ञानवेद अबॅकसचे संचालक संदीप सोनार, लता सोनार, अथर्व कॉम्प्युटर्सचे प्रशांत विसपुते, सखाराम मोरे आदी उपस्थित होते.

स्वतःशी प्रामाणिक बांधिलकी महत्त्वाची

१९७५ साली आम्ही हेमलकसाला आलो, तेव्हा वीज नव्हती, रस्ते नव्हते आणि भाषेचाही अडथळा होता. तरीही आम्ही इथे राहिलो, काम सुरू ठेवले. आज ५० वर्षांनंतर जे परिवर्तन दिसतंय त्यामागचं एकच कारण आहे की, ते म्हणजे स्वतःशी प्रामाणिक बांधिलकी केली तर काहीही साध्य करता येतं. व्यसनमुक्तीसाठीही हीच स्वतःशी प्रामाणिक बांधिलकी सर्वात महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. जळगावच्या आठवणीत त्यांनी भरीत-भाकरीचा आवर्जून उल्लेख केला. जळगावातील त्यांचे परिचितांबाबत त्यांनी गप्पांमध्ये आठवणींना उजाळा दिला.

प्राणी कधीच प्रेम विसरत नाही…!

आदिवासी समाजाच्या जीवनशैलीबद्दल ते म्हणाले की, या समाजाच्या गरजा मर्यादित असल्यामुळे ते नेहमी आनंदी राहतात. ते प्रामाणिक आहेत, चोरी करत नाहीत. त्यांचे जीवन समाधानात आहे. प्राणी संग्रहालयातील अनुभव सांगताना ते म्हणाले, मी वाघासोबत राहतो, त्याच्याशी खेळतो, त्यात काही ट्रिक्स नाहीत. लहानपणापासून दाखवलेलं प्रेमच त्यामागचं कारण आहे. प्राणी कधीच प्रेम विसरत नाही. तो फक्त स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो. माणसांनीही हे समजून घ्यायला हवं. ते विनोदाने पुढे म्हणाले, साप कधीच माती खात नाही, माणूस खातो आणि साप कधीही दू-तोंड्या दिसत नाही, बहुतांश वेळा माणूसच दु-तोंड्या असल्याचे दिसून येते. यावेळी डॉ. दिगंत आमटे आणि अनिकेत आमटे यांचीही भेट झाली. अनिकेत आमटे यांनी व्यसनाचे कार्य जाणून घेतले. १५ ऑक्टोबर रोजी ते जळगाव येणार आहे. त्यावेळी चेतना व्यसनमुक्ती केंद्राला नक्कीच भेट देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

जळगावसह केंद्राच्या परिवारासाठी अभिमानाचा क्षण

व्यसनमुक्तीच्या सामाजिक कार्यात चेतना व्यसनमुक्ती केंद्राने गेल्या अनेक वर्षांत प्रभावी कार्य केले आहे. “व्यसनमुक्तीवर बोलू काही” पुस्तकाद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. जळगाव आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या परिवारासाठी हा क्षण अभिमानाचा असल्याचे डॉ. नितीन विसपुते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here