महिलांनी आनंदी वातावरणात साजरी केली सुवर्ण परंपरा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
अहिर सुवर्णकार महिला मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यांत “भुलाबाई सुवर्ण उत्सव” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. परंपरा, संस्कृती आणि आनंद यांचा सुंदर संगम सोहळ्यात अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शरयू विसपुते, रूपाली वाघ, मीनाक्षी वाघ, मंडळाच्या अध्यक्षा रंजना वानखेडे, उपाध्यक्षा संगीता विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्ज्वलन व संत नरहरी महाराज पूजन तसेच भुलाबाई पूजनाने करण्यात आला. त्यानंतर रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक भुलाबाई गीत गायन, लयबद्ध नृत्य स्पर्धा तसेच हास्य-आनंदाने भारलेल्या मनोरंजनात्मक खेळांद्वारे उपस्थित महिलांनी कार्यक्रमाला अविस्मरणीय रंग भरले.
उत्सवात एक मिनिटात फुगे फुगवणे, शब्दखेळ, गरबा-दांडिया स्पर्धा, पैठणीसाठी खेळ अशा अनेक आकर्षक स्पर्धांचे आयोजन केले होते. महिलांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत प्रत्येक खेळात हशा आणि टाळ्यांचा वर्षाव झाला. तसेच लकी ड्रॉ विशेष उपक्रमात विजया सचिन विसपुते, अनिता अश्विन सोनार ह्या विजेत्या ठरल्या. त्यांना रूपाली वाघ यांच्या हस्ते चांदीची लक्ष्मीची फोटोफ्रेम भेट म्हणून देण्यात आली तर पैठणी खेळासाठी अनिता सोनार यांनी आकर्षक पैठणी बक्षीस दिले.
विविध खेळातील महिला विजेत्या
विविध खेळातील विजेत्यांमध्ये पैठणी खेळात चेतना ऋषिकेश सोनार, भुलाबाई गीत गायनात राजश्री राजेंद्र जाधव, अन्विता विसपुते, दांडिया स्पर्धा विद्या सचिन सोनार, फुगा फुगवणे स्पर्धेत मीनाक्षी रमेश वाघ, शब्दखेळ स्पर्धेत योगिता दुसाने, भुलाबाई नृत्य स्पर्धेत (संघ) सुवर्ण सखी ग्रुप, महाबळ यांचा समावेश आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांना सुगंधी दूध, अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी अध्यक्षा रंजना वानखेडे, उपाध्यक्षा संगीता विसपुते, सचिव राजश्री पगार, खजिनदार सुलभा बागुल, कार्याध्यक्ष विजया जगताप तसेच सदस्य रूपाली भामरे, कांचन विसपुते, सरिता विसपुते, अनिता सोनार, मनीषा रणधीर, प्रमिला बाविस्कर, कविता पगार, सविता मोरे, रत्ना दुसाने, सरिता दुसाने, लता अहिरराव, स्वाती सोनार आदींनी परिश्रम घेतले. तसेच महाराष्ट्र सुवर्णकार सेना यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सचिव राजश्री पगार तर आभार मनीषा रणधीर यांनी मानले.