अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध जिल्हा पोलीस दलाने उचलले कडक पाऊल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्हा पोलीस दलाने अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कडक पाऊल उचलले आहे. १६ ते ३० सप्टेंबर या विशेष मोहिमेत १० देशी बनावटीची अग्निशस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. तसेच १२ आरोपींविरुद्ध ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
कारवाईत अटक झालेल्या अनेक आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यात पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी समाधान निकम याच्यावर आधीच ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच जळगाव शहरातील गुन्ह्यातील आरोपी युनूस पटेलवर २ तर विठ्ठल भोळेवर ३ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे कारवाईचे महत्त्व वाढले आहे. पोलिसांनी वेळेत ही शस्त्रे जप्त केल्याने आगामी काळात घडणारे अनेक मोठे गुन्हे टळले आहेत, असे मानले जात आहे.
मोहिमेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील जळगाव शहरासह पाचोरा, अमळनेर, यावल, भुसावळ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांनी प्रभावी कारवाई केली. त्यात पाचोरा येथून समाधान बळीराम निकम, अमळनेरातील अनिल मोहन चंडाले, यावल येथील युवराज उर्फ युवा राजू भास्कर, भुसावळातून अमर देविसिंग कसोटे, एमआयडीसी जळगाव काचिन बाबु भोसले आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात विठ्ठल वामन भोळे आणि युनूस ऊर्फ सद्दाम सलाम पटेल यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० बनावटी पिस्तूल आणि २४ जिवंत काडतूस जप्त केले आहे.