पूर्वजांनी कष्टाने निर्माण केलेल्या वास्तू विक्रीत धन्यता मानणारी नवी पिढी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
सध्या जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आणि तमाम शेतकऱ्यांमध्ये जळगावमधील नवीपेठ येथील ‘दगडी बँके’ची वास्तू विक्रीचा विषय खूप चर्चेचा विषय बनला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्हाव्यापी संस्थेची सत्तासूत्रे ज्या मंडळींच्या हातात आहे, ती मंडळी पूर्वजांनी अतिशय कष्टाने दूरदृष्टीपणाने ज्या संस्था व वास्तू उभ्या केल्या त्यांनी चालविण्याचे कोणते प्रयत्न करीत आहेत…? असा प्रश्न उपस्थित करून दगडी बँकेची वास्तू विक्री करून ही मंडळी काय साध्य करू इच्छितात…? असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये जोरदारपणे उपस्थित केला जात आहे. दगडी बँकेची वास्तू हा सहकाराचा वारसा (हेरिटेज) असल्याचे बहुसंख्य शेतकऱ्यांचे म्हणणे आहे किंबहुना अशा त्यांच्या भावना आहे.
दगडी बँकेची इमारत जीर्ण झाली आहे. म्हणून ती विक्री करण्याचा प्रयत्न असेल तर त्या इमारतीची वेळोवेळी दुरुस्ती किंवा डागडुजी करून ती अद्ययावत का केली नाही…? या प्रश्नाचे उत्तर वास्तू विक्री करण्याची इच्छा असलेल्यांकडे आहे का…? दगडी बँकेची वास्तू जीर्ण झाली आहे. पण तशीच अवस्था जिल्हा बँकेच्या रिंग रोडवरील मध्यवर्ती कार्यालयाला लागून असलेल्या जे.एस.आप्पा पाटील सभागृहाचीही झालेली आहे. मग सभागृहही विक्रीला काढले जाईल की काय…?
दगडी बँकेच्या वास्तू विक्री करण्याच्या प्रस्तावावरून बरीच चर्चा सुरू आहे. तथापि, वास्तू विक्रीच्या बाजूने कमी आणि विरोधात जास्त मंडळी आहे. वास्तू विक्रीला सर्वात आधी जाहीर विरोध ज्येष्ठ संचालक आ.एकनाथराव खडसे यांनी केला. त्यानंतर इतरही ज्येष्ठ संचालकामध्ये तीच भावना आहे तर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तर दगडी बँक विकण्याची गरज काय…? तुम्हाला पैशांची कडकी लागली आहे का…? असा प्रश्न उपस्थित करून बँकेच्या इमारती विक्रीला स्पष्टपणे विरोध दर्शविला आहे.
सभागृहाच्या दुरुस्तीसाठी तत्परता का नाही…?
जीडीसीसी बँकेचे जे.एस आप्पा पाटील सभागृह हे एक वास्तू कलेचा उत्तम नमुना म्हणून वाखाळले गेलेले आहे. या सभागृहाची रचना आणि एकूणच बांधणी आणि व्यवस्था खूपच चांगली होती. पण गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून बँकेचे सभागृह धूळ खात पडून आहे आणि आता ते ‘नॉन युज’मध्ये आहे. सभागृहाची दुरावस्था सत्ताधारी मंडळीला दिसत नाही का…? वास्तविक बँकेचे हे सभागृह शहराची एक ओळख ठरले होते. अनेक मोठ्या नेत्यांच्या विचार सभा कार्यक्रम नाट्यप्रयोग या सभागृह झाले होते. केवळ दोन-तीन कोटींच्या खर्चात सभागृहाला गतवैभव प्राप्त करता येणे शक्य असतांना, त्या बाबतीत तत्परता का दाखविली जात नाही, अशी विचारणाही रसिक, श्रोते वर्गातून केली जात आहे. वास्तू विक्रीसाठी कंठशोष करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे अपेक्षित आहे. वास्तू विक्री करून त्यातून काय साध्य करावयाचे आहे, त्याचा खुलासाही शेतकऱ्यांना हवा आहे.