साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील कुसुंबा गावात जुन्या वादातून एका कुरिअर व्यावसायिकाच्या घरावर दगडफेक करत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता हा प्रकार घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ५ जणांना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रशेखर त्र्यंबक पाटील (वय-५५, रा. गणपती नगर, कुसुंबा) हे त्यांची पत्नी आणि मुलगे करण व स्वराज यांच्यासह वास्तव्यास आहेत. चंद्रशेखर पाटील यांचा मुलगा करण याचा किरण खर्चे नावाच्या व्यक्तीसोबत मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच जुन्या भांडणाच्या कारणावरून हा हल्ला केला. ४ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पाटील कुटुंबीय जेवण करत असताना सात ते आठ जण दुचाकीवरून पाटील यांच्या घरासमोर आले. त्यांनी सुरुवातीला शिवीगाळ करत करणला बाहेर काढण्याची धमकी दिली, “त्याला आता जीवंत सोडणार नाही” असे धमकावले. त्यानंतर यातील एकाने गावठी पिस्तुलातून चंद्रशेखर पाटील यांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने गोळीबारात पाटील यांना दुखापत झाली नाही.
हल्ला करताना आरोपींनी “आमचा भाऊ किरण खर्चे याच्या नांदी लागू नका, नाही तर करण आणि तुम्हाला जीवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली आणि ते दुचाकीवरून पसार झाले. घटनेत दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली. त्यानंतर चंद्रशेखर पाटील यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, किरण खर्चे, गणेश उर्फ विकी ज्ञानेश्वर गोसावी, सचिन प्रभाकर सोनवणे, हर्षल रामचंद्र महाडिक, निखिल अनिल चव्हाण, रवी राठोड, राकेश कैलास पाटील आणि दिनेश पवार (सर्व रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.