जळगावात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला भामट्यांनी लावला चुना
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कोणताही ओटीपी न कळविता अथवा लिंकला क्लिक करताही एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची ३ लाख ६६ हजार ८९३ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. पाच वेळा ही रक्कम त्यांच्या बँक खात्यातून परस्पर ट्रान्सफर झाली. हा प्रकार गेल्या २९ सप्टेंबर रोजी घडला. दरम्यान, याप्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोणतीही लिंक क्लिक न करता अथवा ओटीपी न देताही रक्कम लांबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मांगीलाल बनवारीलाल पारिक (वय ६५, रा. नेहरूनगर) यांचा ट्रान्सपोर्ट नगरात पूजा रोड कॅरियर नावाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचे खासगी बँकेत खाते आहे. गेल्या २९ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून ९९ हजार ८०० रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यांनी याबाबत मुलाला विचारणा केल्यावर त्याने कुठलाही व्यवहार केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर एकापाठोपाठ रक्कम काढल्याचे मेसेज आले. त्या मेसेजच्या माध्यमातून पारिक यांच्या बँक खात्यातून ३ लाख ६६ हजार ८९३ रुपये काढल्याचे समजले. त्यावेळी ते लगेच बँकेत गेले.
यासंदर्भात शाखा व्यवस्थापकाला माहिती दिली. खात्याचा तपशील पाहून ही रक्कम नेमकी कोठे वर्ग झाली, याबाबत सांगता येणार नसल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. याप्रकरणी मांगीलाल पारिक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. सचिन पाटील करीत आहेत.