सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक गौरव
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे यावल प्रकल्पात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त ‘अमृतयात्री’ डी. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सुनंदा दिगंबर पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी अरुण पवार उपस्थित होते. व्यासपीठावर प्रकल्प अध्यक्ष एडी माळी, उपाध्यक्ष एन. एन. पाटील, सचिव ए.बी. कोंगे, कार्याध्यक्ष एस. एच. चौधरी, व्ही. एन. पाटील, डी. व्ही. चौधरी आदी उपस्थित होते.
यावल प्रकल्पात डी. डी. पाटील हे २७ वर्षांपूर्वी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. अत्यंत कडक शिस्तीचे मुख्याध्यापक म्हणून त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आदरयुक्त भीती होती. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी अनेक आज शासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. यावल प्रकल्पातून त्यांनी बंधारे तालुका नवापूर येथे चार वर्षे आणि आंबे तालुका पेठ येथे दहा वर्षे, म्हणजे १४ वर्षे माध्यमिक मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी जामनेर तालुका साहित्य-सांस्कृतिक मंडळ, बहुउद्देशीय संस्था, व्यायाम शाळा, तालुका निवृत्त सेवा संघ यांसारख्या विविध संस्था स्थापन करून संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. यापूर्वीही राज्याचे ग्रामविकास व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीष महाजन यांच्या हस्ते त्यांना ‘अमृतयात्री’ म्हणून गौरवण्यात आले होते. अशा सत्कारामुळे त्यांची सामाजिक व शैक्षणिक कार्याची महती पुन्हा एकदा अधोरेखित झाली.