चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. नितीन विसपुते यांच्या लिखित पुस्तकाचे प्रकाशन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
समाजसेवक, पद्मश्री तथा मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते ‘व्यसनमुक्तीवर बोलू काही’ पुस्तकाचा भव्य लोकार्पण सोहळा मंगळवारी, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी हेमलकसा येथे पार पडणार आहे. हे पुस्तक जळगावातील परिचित चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नितीन विसपुते लिखित आहे.
समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर आणि त्यावर मात करण्याच्या उपाययोजनांवर आधारित आहे. समाजाच्या पुनर्बांधणीसाठी उपयुक्त असे पुस्तक आत्ममंथन आणि प्रेरणा दोन्हीचा संगम घडवते.याप्रसंगी डॉ. नितीन विसपुते यांच्यासोबत चेतना विसपुते, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनीषा महाजन, ज्ञानवेध अबॅकसचे संचालक संदीप सोनार, लता सोनार, आदित्य कॉम्प्युटरचे संचालक प्रशांत विसपुते, सखाराम मोरे आदी मान्यवर उपस्थित राहतील.
कार्यक्रमामुळे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत सर्व संस्थांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार आहे. जळगाव शहरासाठी आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे. सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांच्या कार्याने आदिवासी भागात मानवतेचा दिवा प्रज्ज्वलित केला अशा डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते होणारा लोकार्पण सोहळा समाजमनाला स्पर्श करणारा ठरणार आहे. ‘व्यसनमुक्तीवर बोलू काही’ पुस्तक प्रत्येक तरुण, पालक, शिक्षक, आणि समाजसेवकांसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे. तसेच व्यसनाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या वाटेचे दर्शन घडवणारे आहे.