बऱ्हानपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
तालुक्यातील खामखेडा येथील बऱ्हानपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू रामा वाघ (वय ५०, रा.खामखेडा) असे मयताचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजू वाघ हे रात्री खामखेडा येथील बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडत होते.
त्याचवेळी बाळू बुधा भोई (वय २८, रा. मेळसांगवे) यांच्या ताब्यातील बजाज पल्सर (क्र. एमएच १९ ईएन ६६३०) या दुचाकीने जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या धडकेत राजू वाघ यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली. श्री.वाघ यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी अरुण रामा वाघ (रा. खामखेडा) यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवन सपकाळ करीत आहे.