Amount Of 40 Thousand : दुचाकी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाला हरवलेली ४० हजाराची रक्कम परत

0
22

सातपुडा ऑटोमोबाईल्सचे सुपरवायझर राजेश दुसाने यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी अजिंठा चौफुली लगतच्या सातपुडा ऑटोमोबाईल्समध्ये दुचाकीची खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाची तब्बल ४० हजार रुपयांची पिशवी हरवली होती. ती शोधूनही न सापडल्याने तो चिंताग्रस्त झाला होता. मात्र, ती रक्कम शोरूममधील कार्यरत सुपरवायझर राजेश दुसाने यांना शोरुमच्या प्रवेशद्वाराबाहेर सापडली. त्यांनी मनात कुठलाही मोह न बाळगता लागलीच मालकांच्या खात्रीने ती पिशवी ग्राहकाला परत केली. हरवलेली रक्कम सुरक्षित मिळाल्याने ग्राहकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दुसाने यांच्या प्रामाणिकपणाचे शोरूमसह सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, आजच्या धावपळीच्या युगात प्रामाणिकपणा जीवंत असल्याचा आदर्श त्यांनी घडवून आणला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील अजिंठा चौफुली लगतच्या सातपुडा ऑटोमोबाईल्समध्ये समता नगरातील किशोर ज्ञानेश्वर मेढे दसऱ्याच्या दिवशी दुचाकीचे वाहन खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी ४० हजार रुपयाची रक्कम असणारी पिशवीही सोबत आणली होती. मात्र, त्यांची पिशवी कुठेतरी गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोरुमच्या परिसरात आणि इतरत्र शोध घेतला. परंतु त्यांना ती मिळून आली नाही. त्यामुळे ते हतबल आणि चिंताग्रस्त झाले होते. शोरुमच्या उजव्या बाजुच्या प्रवेशद्वाराजवळ त्याच वेळेला शोरुमचे कर्मचारी सुपरवायझर राजेश जगन्नाथ दुसाने हे आपल्या मुलाशी मोबाईलवरुन बोलत असतांना त्यांना एक पिशवी सापडली.

त्यांनी ती उचलल्यावर त्याची तपासणी केली. तेव्हा त्यात त्यांना १०० रुपयांच्या नोटांचे ४ बंडल असल्याचे आढळले. सुरुवातीला एवढी रक्कम पाहून तेही आश्चर्यचकित झाले. मात्र, त्यांनी कुठलाही मोह न ठेवता शोरुममधील सहकारी चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने शोरुमचे मालक डी.डी.बच्छाव (सर) यांच्या ताब्यात देऊन राजेश दुसाने यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनीही त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. तसेच वेळ न गमावता पिशवीतील असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे श्री. मेढे यांच्याशी संपर्क साधून शोरुममध्ये बोलावले. त्याच्याकडून रकमेची खात्री केली. ती रक्कम त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही रक्कम त्यांना सुपूर्द करण्यात आली. तसेच मेढे यांनी आनंद व्यक्त करत राजेश दुसाने यांना बक्षीस देऊ केले. परंतु त्यांनी प्रामाणिकपणा जपत ते नाकारले. त्याबद्दलही त्यांचे कौतुक होत आहे. राजेश दुसाने हे अयोध्या नगर भागातील रहिवासी असून ते दै. ‘साईमत’चे उपसंपादक शरद भालेराव यांचे मोठे साडू आहेत.

ग्राहकांचा विश्वास जिंकणे हेच खरे यश

प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे संस्थेच्या नावाला नव्या तेजाची भर पडली आहे. ग्राहकांचा विश्वास जिंकणे हेच खरे यश असल्याचे मत संचालक प्रा.डी.डी.बच्छाव यांनी व्यक्त केले. राजेश दुसाने यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संचालक किरण बच्छाव यांच्यासह शोरुममधील सहकाऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here