शेतकऱ्यांना मानवी साखळी करून जावे लागतेय शेतात
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील धिंगापूर शिवारात शेतात जाण्यासाठीचा रस्ता शनिवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसात पूरात वाहून गेल्यामुळे तीन दिवसापासून निंबायती, जरंडी शिवारातील तीनशेच्यावर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे महत्वाच्या कामासाठी शेतकरी मानवी साखळीने जीव धोक्यात घालून जनावरांना चारा पाणी करण्यासाठी जात आहे
धिंगापूर शिवारात जाण्यासाठी निंबायती आणि जरंडी शिवारातील शेतकऱ्यांना एकमेव सुकी नदीच्या पात्रातून रस्ता आहे.
परंतु शनिवारी रात्री आलेल्या पुरामध्ये हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे ३०० शेतकऱ्यांना या शिवारात जाता येत नाही. परंतु दूध काढणे, जनावरांना चारा पाणी करण्यासाठी या शिवारात जाणे आवश्यक झाले असून शेतकरी गटागटाने मानवी साखळी तयार करून नदीच्या पात्रातून प्रवास करत आहेत. संबंधित विभागाचे वाहून गेलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना गैरसोयीचे झाले आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जीवन तायडे यांनी दिला आहे.