लखनऊ–मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये भुसावळ आणि भादली दरम्यान ब्रेक सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
१ ऑक्टोबर रोजी लखनऊ – मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये भुसावळ आणि भादली दरम्यान ब्रेक सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्लीपर कोचमधून धूर निघाल्याची घटना घडली. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि संभाव्य अपघात टळला. प्रवाशांचा प्रवास सुरक्षीतपणे पुढे सुरू ठेवण्यात आला.
ही घटना १ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. पुष्पक एक्सप्रेस नियोजित वेळेत भुसावळ स्थानकावरून सुटल्यानंतर भुसावळ–भादली दरम्यान असताना एस-४ क्रमांकाच्या स्लीपर कोचच्या चाकांजवळ अचानक धूर दिसून आला. ब्रेक सिस्टीममधील घर्षणामुळे ही समस्या उद्भवली असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.घटना लक्षात येताच ट्रेन मॅनेजर आणि रेल्वे कर्मचारी यांनी तात्काळ गाडी थांबवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
अग्निशमन यंत्रांचा वापर करून धूर पसरू दिला नाही. महत्त्वाचे म्हणजे आग लागलेली नव्हती आणि कोणतीही स्फोटक किंवा गंभीर यंत्रणा निकामी झालेली नव्हती. प्रवाशांना कोणतीही इजा किंवा गैरसोय झाली नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. आवश्यक सुरक्षा तपासणीनंतर गाडीला पुन्हा मुंबईकडे रवाना करण्यात आले. या प्रसंगामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शांत व तत्पर कारवाईमुळे ही भीती लवकरच दूर झाली.
दरम्यान, समाजमाध्यमांवर या घटनेबाबत अपुरी व भ्रामक माहिती पसरत असल्याचे लक्षात आल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत माहिती केवळ रेल्वे प्रशासनाच्या संकेतस्थळ, हेल्पलाइन किंवा अधिकृत सूचनांद्वारेच घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे