‘Mini Secretariat’ : ‘मिनी मंत्रालया’च्या ४ हजारांवर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन थेट खात्यावर जमा

0
23

जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल यांच्या पुढाकाराने कार्यवाही

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जिल्हा परिषद जळगावचे कामकाज हे वेगवान, पारदर्शक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे सातत्याने सुरळीत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या ४ हजार २४९ सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सप्टेंबर २०२५ च्या सेवानिवृत्ती वेतनाची ११ कोटी ५ लाख ९९७ रुपयांची रक्कम दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी, १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता थेट बँक खात्यावर जमा केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा दसरा खऱ्या अर्थाने आनंदाचा व गोड ठरला आहे. सीईओ मिनल करनवाल यांनीच दसऱ्याच्या आधीच निवृत्ती वेतन जमा होईल, यासाठी अर्थ विभागास आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील पेन्शन शाखेने तालुकास्तरावरून माहिती तातडीने गोळा करून तपासणी पूर्ण केली व शासकीय प्रणालीद्वारे सेवानिवृत्तांचे वेतन त्यांच्या खात्यावर नियमानुसार वेळेत जमा केले. अशा उपक्रमामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनाला आधार मिळाला आहे.

पारदर्शक, जलद कार्यप्रणालीला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा परिषदेचे कामकाज अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने होत असल्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. अशा यशस्वी उपक्रमासाठी सीईओ मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरीया, सहाय्यक लेखाधिकारी निशीथ शर्मा, कनिष्ठ लेखाधिकारी गुलाबराव पाटील, वरिष्ठ सहाय्यक लेखा सुमेध जाधव तसेच तालुकास्तरावरील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अशा पुढाकारामुळे जिल्हा परिषदेच्या पारदर्शक व जलद कार्यप्रणालीला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याबद्दल कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here