चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची पाखरण
साईमत/भुसावळ :
येथील जैन समाज संचलित सुशील बहुल महिला मंडळाच्यावतीने नवरात्रीचे औचित्य साधत यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते चवथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊ किटचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सांगवी खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुशील बहुल समूहाच्या ज्येष्ठ सदस्य आशा कोटे उपस्थित होत्या. तसेच मंडळाच्या मंगला कोटे, पारस नाहटा, ज्योती गादिया, किरण कोटे, कल्पना गादिया, सुनीता गादिया, कल्पना नहार, सपना नाहटा आदींचा सहभाग राहिला.
कार्यक्रमाची सुरुवात सांगवी खुर्द शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपशिक्षिका जयश्री काळवीट यांनी शाळेतील विविध उपक्रमांची उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. सुशील बहुल महिला मंडळाच्या ज्योती गादिया] सपना नाहटा यांनी “शिक्षणाची कास कधीही सोडू नका. शिकाल तर टिकाल.” असा विद्यार्थ्यांना संदेश दिला.
नवरात्रीच्या पवित्र पर्वात ‘दानं परं भूषणम्’ अशा उक्तीला अर्थपूर्ण ठरवत चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची पाखरण करणाऱ्या सुशील बहुल महिला मंडळातील सर्व नवदुर्गांचे आभार व्यक्त करण्यात आले. सूत्रसंचालन उपशिक्षिका जयश्री काळवीट तर आभार मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी मानले.