पाद्यपूजन, अभिषेक, गुरुपूजनासह नामसंकीर्तन प्रवचनाचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिपादन :
तालुक्यातील कुसुंबा येथील सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज सेवा प्रतिष्ठानतर्फे स्वामी समर्थ शाळेजवळील सद्गुरू पादुका व कल्पवृक्ष शिवमंदिर, गट नं. ३८६, पुरुषोत्तम पाटील नगरात स.स. दत्ता आप्पा महाराज यांचा १७ वा पुण्यतिथी सोहळा आश्विन शुद्ध अष्टमी, मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. सुरुवातीला दै.‘साईमत’चे उपसंपादक शरद भालेराव यांच्या हस्ते पाद्यपूजन, अभिषेक, गुरुपूजन करण्यात आले. त्यांना प्रतिष्ठानचे सदस्य भागवत चौधरी यांच्या हस्ते दत्ता आप्पा महाराज यांचा ग्रंथ भेट देण्यात आला.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव जगदीश देवरे यांनी दासबोधाचे वाचन करुन आप्पा महाराजांचे विविध भजने सादर केली. तसेच इस्कॉन परिवाराचे सुनील जाखेटे (सी.ए.) यांचे नामसंकीर्तन प्रवचन झाले. त्यांनी भगवद्गीतेमधील शिष्याचे गुरुप्रती कर्तव्य, त्याग, सदाचार, समर्पण भाव जोपासल्याने शिष्याची उन्नती तसेच त्याला मानसिक समाधान नकळतपणे मिळत असते. कठीण परिस्थितीतही त्याला मार्ग सापडत असतो, असेही त्यांनी प्रवचनात सांगितले.
सोहळ्यात महाआरती, पुष्पवृष्टीसह भाविकांना प्रसादाचे वाटप
यावेळी निमखेडीचे ह.भ.प. संजय महाराज, हेमंत प्रभुजी (पुणे) यांनी संगीतम सुश्राव्य भजन, सत्संग सादर केले. यासोबतच जया कातोरे यांनी अष्ट कुमारिकांचे पूजन केले. सोहळ्यानिमित्त महाआरती, पुष्पवृष्टी, प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला पत्रकार शरद भालेराव, विजय ढाके, तेजस ढाके, डी.के. चोपडे, ज्ञानेश्वर जाधव,भागवत चौधरी, चंद्रकला जाधव, चंद्रकला चौधरी यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अनिल कातोरे, महेंद्र चोपडे यांच्यासह प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सोहळ्यासाठी सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची लक्षणीय गर्दी लाभली होती.