Short Circuit : शॉर्टसर्किट : जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूतीगृहात आग

0
23

अनर्थ टळला, कर्मचाऱ्यांनी दाखविली तत्परता, जीवितहानी टळली

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसूतीगृहात सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि त्वरित वापरलेल्या अग्निशमन यंत्रांच्या साहाय्याने ही आग काही मिनिटातच आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब ठरली.

प्राप्त माहितीनुसार, आग लागल्यानंतर प्रसूतीगृहातील विद्युत मीटर पूर्णपणे जळून खाक झाला. ज्यामुळे परिसरात धुराचे लोट आणि दुर्गंधी पसरली. तसेच वातावरणात घबराट निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने प्रसूतीगृहात उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवले. प्रसूतीगृहाचे अधिकारी तुषार पाटील यांनी सांगितले, “घटनेनंतर विद्युत पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. आग केवळ मीटरपर्यंत मर्यादित राहिल्यामुळे मोठ्या अनर्थापासून बचाव झाला.”

विद्युत ऑडिट करून तात्काळ दुरुस्ती करा

घटनेनंतर रुग्णालयाच्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा घटना घडणे धोकादायक ठरू शकते, अशी चिंता कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंत्रणेचे संपूर्ण विद्युत ऑडिट करून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here