दहावी, बारावी, पदवी, पदविकांसह अन्य परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंतांना सन्मानित करून मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दहावी, बारावी, पदवी, पदविका आणि अन्य परीक्षेत उत्तीर्ण ४५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ रविवारी, २८ रोजी पार पडला. अध्यक्षस्थानी सुरेश चौधरी होते. सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन करून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजू मामा भोळे तसेच व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सुरेश चौधरी, सचिव नारायण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभात विद्यार्थ्यांना ऑफिस बॅगसह प्रशस्तीपत्रक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची सेवा करणे, अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आणि सदैव शिस्तीने जीवन घालविण्याविषयी आ. राजू मामा भोळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच गौरी सुहास पाटील, साक्षी चौधरी, दामिनी चौधरी आणि अमृता चौधरी यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी दुर्गेश चौधरी, मनोज चौधरी, दर्पण चौधरी, राहुल चौधरी, सुनील चौधरी, गुलाब चौधरी, विनोद चौधरी, गजानन चौधरी, दिलीप चौधरी, कैलास चौधरी, उमेश चौधरी, पिंटू चौधरी यांच्यासह समाजबांधवांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उपाध्यक्ष सुरेश चौधरी, सूत्रसंचालन लोटन चौधरी तर आभार सचिव नारायण चौधरी यांनी मानले.