धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव विमानतळावर धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ असा शासन आदेश लागु करावा, अशी मागणी केली. तसेच उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची तातडीने भेट घ्यावी आणि अनुसूचित जमातींच्या यादीत दुरुस्ती करावी, अशी धनगर समाजाची ठाम मागणी असल्याचे बोलूनही दाखविले. मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करुन लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे जालना येथील उपोषणस्थळाकडे लक्ष वेधले. जिथे दीपक बोराडे यांनी १२ दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. अद्यापपर्यंत कोणताही मंत्री त्यांना भेटीसाठी गेलेला नसल्याने समाजात संताप आणि आक्रोश निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना उपोषणस्थळी भेटीसाठी पाठविण्याचे आदेश दिल्यानंतर ते हेलिकॉप्टरने जालन्यात रवाना झाले.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
शिष्टमंडळात सकल धनगर समाजाचे नेते अरविंद देशमुख यांच्यासोबत संदीप तेले, सुभाष करे, दिलीप धनगर, अरुण ठाकरे, प्रभाकर न्हाळदे, संजय पाटील, तुळशीराम सोनवणे, प्रवीण पवार, दिलीप नाझरकर, महेंद्र सोनवणे, भूषण चिंचोरे, गणेश बागुल, संतोष कचरे, यशवंत शिरोळे, अनिल मनोरे, दिगंबर धनगर आदी समाजबांधव उपस्थित होते.